Skip to content
वेद पथ वैदिक ज्ञानाचा मार्ग

एकादशी व्रत कथा

शेअर करा

उपवासाची आवश्यकता

आपल्या देशात सामान्यतः सर्व लोक उपवास करतात. आठवड्यातील कोणत्या ना कोणत्या दिवशी उपवासाचे व्रत ठेवतात आणि त्याद्वारे विविध देवतांना प्रसन्न करण्याची इच्छा असते. या व्रतामागे काहीतरी उद्देश निश्चितच असतो. साधारणतः धनप्राप्तीसाठी, आजारातून बरे होण्यासाठी, राजकारणात पद मिळवण्यासाठी, चांगली नोकरी, पत्नी किंवा पती मिळवण्यासाठी लोक उपवास करतात.

भौतिक इच्छापूर्तीसाठी उपवास केल्याने पुष्कळ वेळा फळ मिळते. पण हे फळ भौतिक असल्याने केवळ क्षणिक असते. असे व्रत करणे म्हणजे भगवंतांशी केलेला सौदाच होय. आपली इच्छा पूर्ण होताच व्रत संपवून आपण विसरून जातो. ‘गरज सरो, वैद्य मरो!’ श्रील प्रभुपाद अशा अनुष्ठानांना ‘भौतिक धर्म’ म्हणत असत.

भगवान श्रीकृष्णाचे भक्तही एकादशी, जन्माष्टमी, रामनवमी, गौर पौर्णिमा, नरसिंह जयंती, व्यासपूजा किंवा इतर वैष्णव तिथींना उपवास करतात, व्रत ठेवतात. यामागे त्यांचा काय उद्देश असतो? वस्तुतः भक्तांना कोणतीही भौतिक कामना नसते. भक्त आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी हे व्रत करतात. व्रताचे पालन करणे हे मूळ तत्त्व नसून, भगवंतांप्रती आपली श्रद्धा वाढवणे हे त्याचे कारण आहे. उपवास केल्याने मन शुद्ध होते; मनाला वश करून भगवान श्रीकृष्णाची सेवा उत्तम प्रकारे करण्यासाठी उपवास साहाय्यक ठरतो.

एकादशीच्या दिवशी अन्नाचा त्याग करून, शारीरिक गरजा कमी करून श्रवण-कीर्तनाद्वारे भगवंतांची अधिकाधिक सेवा करणे हाच उपवासाचा उद्देश आहे. यामुळे भगवंत संतुष्ट होतात. भारतात अनादी काळापासून एकादशी व्रताचे पालन केले जाते. परंतु सध्या लोकांना अध्यात्माविषयी काही रुची राहिलेली नाही. जर कोणी एकादशी व्रत ठेवू इच्छित असेल तर घरातील माणसे नाराज होतात. एकादशी व्रताचे पालन वृद्ध-वयस्क लोकांनी करावे, तरुणांनी तर खाऊनपिऊन मौज करावी — असा उपदेश दिला जातो.

श्रील प्रभुपाद एकादशी तसेच इतर उत्सवांच्या वेळी व्रत ठेवणे हा आध्यात्मिक जीवनाचा महत्त्वाचा भाग मानतात. ते म्हणतात, “ही सर्व विधिविधाने आपल्या महान आचार्यांनी अशा लोकांसाठी बनवली आहेत जे दिव्य जगतात भगवंतांचा सहवास मिळवू इच्छितात. महात्मे ही सर्व विधिविधाने मानतात, म्हणून त्यांना फळ मिळते.”

— प्रकाशक

१. उत्पन्ना एकादशी

उत्पन्ना एकादशीचे माहात्म्य भविष्योत्तर पुराणात भगवान श्रीकृष्ण आपला सखा अर्जुनाला सांगतात.

नैमिषारण्यात एकत्र आलेल्या सर्व ऋषींना सूत गोस्वामी सांगतात, “भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितल्याप्रमाणे जो नियमपूर्वक एकादशीव्रत करतो, त्याला या जन्मात आनंद आणि पुढील जन्मात वैकुंठलोकाची प्राप्ती होते.”

एकदा अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना विचारले, “हे जनार्दन! एकादशीच्या दिवशी पूर्ण उपवास केल्याने, किंवा केवळ रात्री जेवल्याने, किंवा केवळ दुपारी प्रसाद घेतल्याने काय लाभ मिळतो?”

तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, “हे अर्जुना! हेमंत ऋतूच्या प्रारंभीच्या मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी करावी. प्रातःकाळी उठून हिचा प्रारंभ करावा. दुपारी स्नान करून शुद्ध व्हावे. स्नान करताना पृथ्वीमातेची अशी प्रार्थना करावी —

अश्वक्रान्ते रथक्रान्ते विष्णुक्रान्ते वसुन्धरे। मृत्तिका हर मे पापं यन्मया पूर्वसंचितम्॥

“हे अश्वक्रान्ते! हे रथक्रान्ते! हे विष्णुक्रान्ते! हे वसुंधरे! हे मृत्तिके! हे पृथ्वीमाते! पूर्वजन्मांतील माझी सर्व पापे नष्ट कर, जेणेकरून मी उच्च ध्येयाची (भगवद्धामाची) प्राप्ती करू शकेन.”

त्यानंतर भगवान श्रीगोविंदाची पूजा करावी.

एकदा देवराज इंद्र सर्व देवतांसह श्रीविष्णूंकडे गेले आणि अशी प्रार्थना करू लागले, “हे जगन्नाथ! हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंता! आमचा प्रणाम स्वीकार करा. आपण सर्वांचे आश्रय आहात. आपणच सर्वांचे मातापिता आहात. आपण सर्वांचे सृजन, पालन व विनाश करणारे आहात. आपण धरती, आकाशासह सर्व ब्रह्मांडांचे हित करणारे आहात. आपणच ब्रह्मा, विष्णू व महेश आहात. यज्ञ, तपस्या व वैदिक मंत्रांचे स्वामी तसेच भोक्ते आपण आहात. या जगात अशी कोणतीही (चराचर) वस्तू नाही जिच्यावर आपले नियंत्रण नाही. संपूर्ण जगातील चराचर वस्तूंचे स्वामी तसेच नियंत्रक आपणच आहात. हे पूर्ण पुरुषोत्तमा! हे देवेश्वरा! हे शरणागतवत्सला! हे योगेश्वरा! दानवांनी सर्व देवतांना स्वर्गातून हाकलून लावले आहे आणि भयाने त्यांनी आपल्या चरणांचा आश्रय घेतला आहे. कृपया त्यांचे रक्षण करा. हे जगन्नाथ! स्वर्गातून या भूलोकावर पतन होऊन आम्ही या दुःखसागरात बुडत आहोत. कृपया आपण आमच्यावर प्रसन्न व्हा.”

अशा प्रकारे इंद्राची दयेची प्रार्थना ऐकल्यावर भगवान श्रीविष्णूंनी विचारले, “असा कोणता अजिंक्य दानव आहे, ज्याच्याकडून देवता पराभूत होत आहेत? त्याचे नाव काय आहे? त्याच्या शक्तीचा स्रोत काय आहे? हे इंद्रा, निर्भयपणे सर्व माहिती आम्हांला सांग.”

इंद्र म्हणाला, “हे देवेश्वरा! हे भक्तवत्सला! हे पुरुषोत्तमा! देवतांमध्ये भय व चिंता निर्माण करणारा असुर नंदीजंघ ब्राह्मणकुळात उत्पन्न झाला आहे. त्याच्यासारखाच त्याचा बलशाली व कुप्रसिद्ध मूर नावाचा मुलगा आहे. चंद्रावती नावाचे भव्य नगर मूर राक्षसाची राजधानी आहे. याच मूर राक्षसाने सर्व देवतांना स्वर्गातून हाकलून स्वतः तिथे निवास करत आहे. इंद्र, अग्नी, चंद्र, वरुण, यम, वायू आणि ईश — या सर्व देवतांचे अधिकार त्याने हिरावून घेतले आहेत. आम्ही सर्व देवता मिळूनही त्याला पराभूत करू शकलो नाही. हे विष्णो! आपण कृपया त्याचा अंत करून देवतांचे रक्षण करा.”

इंद्राचे हे शब्द ऐकताच देवतांना कष्ट देणाऱ्या मूर राक्षसाविषयी श्रीविष्णूंना क्रोध आला आणि ते म्हणू लागले, “हे देवराज! मी स्वतः त्या शक्तिशाली दानवाचा वध करीन. तुम्ही सर्वजण चंद्रावती नगरात चला.” सर्व देवता भगवंतांच्या सांगण्यानुसार चंद्रावती नगरीत जाऊन अनेक प्रकारची शस्त्रे जमा करू लागले.

दानवांच्या सामर्थ्यामुळे आधीच सर्व देवता भयभीत होते. पण आता भगवान श्रीविष्णूंच्या नेतृत्वाखाली निर्भय होऊन देवता रणभूमीवर पोहोचले. त्यांना पाहून राक्षस क्रोधित झाले. भगवंतांनी सर्व असुरांना पराभूत केले, परंतु मूरला पराभूत करणे कठीण वाटू लागले. अनेक अस्त्रशस्त्रांचा उपयोग करूनही भगवंत मूर राक्षसाला मारू शकले नाहीत. दहा हजार वर्षे दोघांमध्ये बाहुयुद्ध चालले; अखेरीस मूर राक्षसाला पराभूत करून भगवंत बद्रिकाश्रमात हेमवती नामक गुहेत विश्रांतीसाठी गेले.

भगवान श्रीकृष्ण म्हणू लागले, “हे अर्जुना! त्या असुराने गुहेपर्यंत पाठलाग करून तिच्यात प्रवेश केला आणि श्रीविष्णूंना निद्रावस्थेत मारण्याचा विचार केला. त्या वेळी त्यांच्या शरीरातून एक तेजस्वी कन्या बाहेर पडली. ती शस्त्रांनी परिपूर्ण होती; तिने मूर राक्षसाशी बराच वेळ युद्ध करून त्याचा वध केला. उरलेले दानव भयभीत होऊन पाताळलोकात गेले. श्रीविष्णूंनी निद्रेतून जागे होऊन मूर राक्षसाचा मृतदेह आणि त्यांच्यासमोर हात जोडून उभी असलेली कन्या पाहिली तेव्हा ते आश्चर्याने विचारू लागले, “तू कोण आहेस?”

त्या देवीने उत्तर दिले, “हे भगवंता! मी आपल्या शरीरातून उत्पन्न झाले आहे आणि या असुराचा मी वध केला आहे! आपल्याला निद्रावस्थेत पाहून मारण्यासाठी येणाऱ्या या असुराचा मला वध करावा लागला!”

भगवान श्रीविष्णू म्हणाले, “हे देवी! तुझ्या या कार्याने मी प्रसन्न आहे. तू मनासारखा वर माग.” जेव्हा देवीने वर मागितला तेव्हा भगवान श्रीविष्णू म्हणाले, “तू माझी आध्यात्मिक शक्ती आहेस; एकादशीच्या दिवशी उत्पन्न झाल्यामुळे तुझे नाव एकादशी असेल. जो कोणी एकादशी व्रत करील त्याला अक्षय सुखाची प्राप्ती होईल.”

“त्या दिवसापासून एकादशीचा दिवस विश्वात पवित्र दिवस म्हणून ओळखला जातो. हे अर्जुना! जो हिचे पालन करील त्याला मी परम (उच्च) गती प्रदान करतो! हे अर्जुना! एकादशी व द्वादशी एकाच तिथीत आल्यास त्या एकादशीला सर्वोच्च मानले गेले आहे. एकादशीच्या दिवशी मैथुन, अन्न, मद्य, मांस, स्वयंपाकात कांस्याची भांडी, शरीराला तेल लावणे वर्ज्य आहे. जो हिचे माहात्म्य जाणून व्रत करील त्याला अधिक फळप्राप्ती होईल.”

२. मोक्षदा एकादशी

ब्रह्मांड पुराणात मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या मोक्षदा एकादशीचे माहात्म्य भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिराला सांगतात.

युधिष्ठिर महाराजांनी विचारले, “हे देवदेवेश्वरा! मार्गशीर्षाच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीचे नाव काय आहे? ती कशा प्रकारे करावी, कोणत्या देवतेचे पूजन करावे? कृपया या विषयावर विस्ताराने सांगा!”

भगवान श्रीकृष्ण म्हणाले, “मार्गशीर्षाच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला मोक्षदा म्हणतात. हिचा महिमा ऐकल्याने वाजपेय यज्ञाचे फळ प्राप्त होते. ही एकादशी पापहरण करते. हे राजन्! या दिवशी तुळशीची मंजिरी आणि धूपदीपासह भगवान दामोदराची पूजा करावी. मोठमोठी पातके नष्ट करणाऱ्या मोक्षदा एकादशीच्या रात्री माझ्या प्रसन्नतेसाठी नृत्य, कीर्तन व कथा करून जागरण करावे. ज्यांचे पूर्वज नरकात आहेत, त्यांनी या एकादशीचे पुण्य पूर्वजांना दान केल्याने त्यांना मोक्षाची प्राप्ती होते.”

प्राचीन काळी वैष्णवांची वस्ती असलेल्या रमणीय चंपक नगरात वैखानस महाराज राज्य करत होते. ते आपल्या प्रजेचे संततीप्रमाणे पालन करत असत. एका रात्री त्यांनी स्वप्नात पाहिले की त्यांचे पितर नीच नरकयोनीत आहेत. आपल्या पितरांच्या या अवस्थेने आश्चर्यचकित होऊन दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी ब्राह्मणांना बोलावून त्या स्वप्नाविषयी सांगितले.

महाराज म्हणाले, “हे ब्राह्मणहो! मी माझ्या पितरांना नरकात पाहिले आहे. वारंवार रडत-आक्रंदत ते मला सांगत होते — तू आमचा तनुज आहेस, तूच आम्हांला या स्थितीतून काढू शकतोस. हे द्विजवर! मी त्यांच्या या अवस्थेने अत्यंत विचलित आहे. काय करावे? कोठे जावे? काहीच समजत नाही. हे द्विजश्रेष्ठ! कोणते व्रत, तप किंवा योग केल्याने माझ्या पूर्वजांचा नरकातून उद्धार होईल, कृपया मला सांगा. माझ्यासारखा बलवान व साहसी पुत्र असूनही माझे मातापिता नरकात असतील, तर माझे जीवन व्यर्थ नाही का?”

ब्राह्मण म्हणू लागले, “राजन्! जवळच पर्वतमुनींचा आश्रम आहे, त्यांना भूतभविष्य ज्ञात आहे. हे नृपश्रेष्ठ! आपण त्यांच्याकडे जा.”

ब्राह्मणांचे बोलणे ऐकून तत्काळ राजा पर्वतमुनींच्या आश्रमात गेला आणि मुनींना दंडवत करून त्यांचे चरणस्पर्श केले. मुनींनीही राजाचे कुशलक्षेम विचारले.

महाराज म्हणू लागले, “स्वामिन्! आपल्या कृपेने राज्यात सर्व कुशल आहे. परंतु मी स्वप्नात पाहिले की माझे पूर्वज नरकात आहेत. कोणत्या पुण्याने त्यांना मुक्ती मिळेल, कृपया आपण सांगा.”

राजाचे वचन ऐकून मुनी काही काळ ध्यानस्थ झाले आणि राजाला म्हणाले, “महाराज! मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षात मोक्षदा एकादशी येते. त्या व्रताचे आपण सर्वांनी पालन करून त्याचे पुण्य पूर्वजांना दान करा. त्या पुण्याच्या प्रभावाने त्यांची नरकातून मुक्ती होईल.”

भगवान श्रीकृष्ण म्हणाले, “हे युधिष्ठिरा! मुनींचे वचन ऐकताच राजाने घरी परतून एकादशी व्रत धारण करून त्याचे पुण्य आपल्या पितरांना दान केले. ते पुण्य दान करताच आकाशातून पुष्पवृष्टी झाली. वैखानस महाराजांचे पितापूर्वज नरकातून बाहेर पडून आकाशात आले आणि राजाला म्हणाले, “पुत्रा! तुझे कल्याण होवो!” हा आशीर्वाद देऊन ते सर्व स्वर्गात गेले.

अशा प्रकारे जो कोणी चिंतामणीसमान अशा या एकादशीचे व्रत करील त्याला मृत्यूनंतर मोक्ष मिळेल. जो हे माहात्म्य ऐकेल, वाचेल त्याला वाजपेय यज्ञाच्या फळाची प्राप्ती होईल.

३. सफला एकादशी

ब्रह्मांड पुराणात भगवान श्रीकृष्ण व महाराज युधिष्ठिर यांच्या संवादात सफला एकादशीचे माहात्म्य सांगितले आहे. युधिष्ठिर महाराजांनी विचारले, “हे स्वामिन्! पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीचे नाव काय आहे? हे व्रत कशा प्रकारे करतात? कोणत्या देवतेची पूजा करतात? याविषयी आपण विस्ताराने सांगा.”

भगवान श्रीकृष्ण म्हणाले, “राजेंद्रा! मोठमोठे यज्ञ केल्याने जो आनंद प्राप्त होतो, त्याहून अधिक आनंद या व्रताचे पालन करणाऱ्याकडून मला होतो. यथाशक्ती विधिपूर्वक प्रत्येक व्यक्तीने हे व्रत करावे. भगवान नारायणाची पूजा करावी. ज्याप्रमाणे सर्पांमध्ये शेषनाग, पक्ष्यांमध्ये गरुड, देवतांमध्ये श्रीविष्णू आणि मानवांमध्ये ब्राह्मण श्रेष्ठ आहेत, त्याचप्रमाणे सर्व व्रतांमध्ये एकादशी तिथी श्रेष्ठ आहे. हे राजन्! सफला एकादशीच्या दिवशी नाममंत्राचा उच्चार करत नारळ, सुपारी, आंबा, लिंबू, डाळिंब, आवळा, लवंग, बोर आदी फळे अर्पण करून श्रीहरींची पूजा करावी. धूपदीपाने भगवंतांची अर्चना करावी. सफला एकादशीला विशेषकरून दीपदान करण्याचेही विधान आहे. रात्री वैष्णवांसह भगवत्कथा, कीर्तन करत जागरण करावे. हजारो वर्षांच्या तपस्येशीही या रात्रीच्या जागरणाच्या फळाची तुलना करता येत नाही.”

“हे नृपश्रेष्ठ! आता या सफला एकादशीची शुभदायी कथा ऐक. प्राचीन काळी चंपावती नामक सुंदर नगरी महाराज माहिष्मतांची राजधानी होती. त्यांना पाच पुत्र होते. ज्येष्ठ पुत्र नेहमी पापकर्मे करत परस्त्रीसंग व वेश्यासक्त होता. त्याने आपल्या पित्याचे धन पापकर्मांत नष्ट केले. तो दुराचारी ब्राह्मण, वैष्णव व देवतांची निंदा करत असे. त्याची ही पापकर्मे पाहून राजाने त्याचे नाव लुभ्भक ठेवले. काही दिवसांनी पिता व इतर भावांनी त्याला राज्यातून हाकलून दिले. लुभ्भक घनदाट वनात निघून गेला. वनात राहत असताना लुभ्भक प्रवाशांना लुटू लागला. एके दिवशी नगरात चोरी करण्यासाठी लुभ्भक गेला तेव्हा शिपायांनी त्याला पकडले. आपल्या पित्याचे नाव सांगितल्यावर शिपायांनी त्याला सोडून दिले. तो पुन्हा वनात गेला आणि मांस व फलाहारावर उदरनिर्वाह करू लागला. तो दुष्ट प्राचीन वडाच्या झाडाखाली विश्रांती घेत असे. ते झाड अत्यंत प्राचीन असल्याने त्या वनात त्या वृक्षाला महान देवता मानले जात असे.”

पुष्कळ दिवसांनी संचित पुण्यप्रभावाने त्याने एके दिवशी नकळत एकादशी व्रताचे पालन केले. पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील दशमीला लुभ्भक वृक्षाची फळे खाऊन आणि वस्त्रहीन असल्यामुळे रात्रभर थंडीत झोपू शकला नाही. जवळजवळ तो बेशुद्ध झाला होता. ‘सफला’ एकादशीच्या दिवशीही तो बेशुद्धच राहिला. दुपारी त्याला शुद्ध आली. उठून अथक प्रयत्नाने चालत, भुकेने व्याकूळ होऊन तो घनदाट वनात गेला. फळे घेऊन तो परतला तेव्हा सूर्यास्त होत होता. म्हणून त्याने ती फळे वृक्षाच्या मुळाशी ठेवली आणि प्रार्थना केली की भगवान लक्ष्मीपती विष्णूंनी या फळांचा स्वीकार करावा. असे म्हणून लुभ्भक त्या रात्रीही झोपला नाही. यामुळे नकळत त्याच्याकडून व्रतपालन घडले.

त्या वेळी आकाशवाणी झाली, “हे राजकुमारा! ‘सफला’ एकादशीच्या फळाच्या प्रसादाने तुला राज्य व पुत्रप्राप्ती होईल.” तेव्हा त्याचे मनपरिवर्तन झाले. त्या काळापासून त्याने आपली बुद्धी भगवान विष्णूंच्या भजनात लावली. त्यानंतर तो आपल्या पित्याकडे परतला; पित्याने त्याला राज्य दिले, अनुरूप राजकन्येशी विवाह करून तो पुष्कळ वर्षे उत्तम राज्य करत राहिला. भगवान विष्णूंच्या वरदानाने त्याला ‘मनोज’ नामक पुत्राची प्राप्ती झाली. मनोज राज्य सांभाळण्यायोग्य झाला तेव्हा लुभ्भकाने आसक्तिरहित होऊन राज्याचा त्याग केला आणि तो भगवान श्रीकृष्णाला शरणागत झाला. अशा प्रकारे सफला एकादशीच्या व्रतप्रभावाने त्याला या जन्मात सुख प्राप्त झाले, सोबतच मृत्यूनंतर मोक्षाचीही प्राप्ती झाली. सफला एकादशीच्या पालनाने तसेच महिमा ऐकल्याने मनुष्याला राजसूय यज्ञाचे फळ प्राप्त होते.

४. पुत्रदा एकादशी

भविष्योत्तर पुराणात भगवान श्रीकृष्ण तसेच महाराज युधिष्ठिर यांच्या संवादात पुत्रदा एकादशीच्या माहात्म्याचे वर्णन मिळते.

महाराज युधिष्ठिरांनी विचारले, “हे श्रीकृष्णा! कृपा करून मला पौष मासाच्या शुक्ल पक्षातील एकादशीचे वर्णन सांगा. त्या व्रताची विधी काय आहे? तसेच कोणत्या देवतेची पूजा केली जाते?”

भगवान श्रीकृष्ण म्हणाले, “जगत्कल्याणासाठी या एकादशीचे मी वर्णन करीन. इतर एकादशीप्रमाणेच या एकादशीचे व्रत करावे. हिला ‘पुत्रदा’ म्हणतात. सर्व पापांचे हरण करणारी ही सर्वोत्तम तिथी आहे. कामना व सिद्धी पूर्ण करणारे भगवंत या तिथीचे अधिदेवता आहेत. संपूर्ण त्रिलोकात ही सर्वात उत्तम तिथी आहे.”

“एके दिवशी घोड्यावर स्वार होऊन महाराज सुकेतुमान घनदाट वनात गेले. पुरोहित व इतर लोकांना याची कल्पना नव्हती. पशुपक्ष्यांनी भरलेल्या या घनदाट वनात महाराज भ्रमण करत होते. दुपार होताच महाराजांना भूक व तहान लागली. पाण्याच्या शोधात महाराज इकडेतिकडे फिरत होते. पूर्वजन्मीच्या पुण्याने त्यांना एक जलाशय दिसला. त्या जलाशयाजवळच एका मुनींचा आश्रम होता. अनेक शुभ शकुन होऊ लागले, त्यांचा डावा डोळा व डावा हात स्फुरू लागला. शुभ घटनेच्या आशेने राजा आश्रमात गेले. त्यांना पाहून राजाला फार प्रसन्नता वाटली. घोड्यावरून उतरून राजाने सर्व मुनींना प्रणाम केला, तेव्हा त्या मुनींनी सांगितले, “हे राजन्! आम्ही तुझ्यावर प्रसन्न आहोत.”

राजाने विचारले, “हे मुनिगण! आपण कोण आहात? आपली नावे काय आहेत? आपण इथे कोणत्या उद्देशाने एकत्र आला आहात? कृपया आम्हांला सत्य सांगा.”

मुनी म्हणाले, “राजन्! आम्ही विश्वदेव आहोत. आजपासून येणाऱ्या पाचव्या तिथीपासून माघ मास सुरू होईल. आज ‘पुत्रदा’ एकादशी आहे. जो कोणीही ही एकादशी करतो त्याला पुत्रप्राप्ती निश्चितच होते.”

राजाने सांगितले, “विश्वदेवगण! जर आपण माझ्यावर प्रसन्न असाल तर मला कृपया पुत्रप्राप्ती होवो!”

मुनी म्हणाले, “राजन्! आज ‘पुत्रदा’ एकादशी आहे. आज आपण हिचे पालन करा; भगवान केशवांच्या प्रसादरूपाने आपल्याला पुत्रप्राप्ती होईल.”

भगवान श्रीकृष्ण म्हणाले, “हे युधिष्ठिरा! अशा प्रकारे मुनींच्या सांगण्यावरून राजाने एकादशी व्रत केले. द्वादशीला व्रत संपूर्ण करून (पारणे करून) मुनींचा आशीर्वाद घेऊन राजा परतला. त्यानंतर राणी गर्भवती झाली आणि एकादशीच्या पुण्याने राजाला तेजस्वी पुत्राची प्राप्ती झाली. त्याने आपल्या उत्तम गुणांनी आपल्या पित्याला संतोष दिला; तो उत्तम प्रजापालक होता. म्हणून, हे राजन्! ‘पुत्रदा’ व्रत अवश्य करावे. जो कोणीही या व्रताचे पालन करतो त्याला पुत्राची प्राप्ती होऊन तो मनुष्य स्वर्ग प्राप्त करतो.”

“जो या व्रताचा महिमा वाचेल, ऐकेल किंवा सांगेल त्याला अश्वमेध यज्ञाचे फळ प्राप्त होईल.”

५. षट्तिला एकादशी

भविष्योत्तर पुराणात भगवान श्रीकृष्ण व युधिष्ठिर महाराज यांच्या संवादात षट्तिला एकादशीच्या माहात्म्याचे वर्णन आहे.

युधिष्ठिराने विचारले, “हे जगन्नाथ! हे श्रीकृष्णा! हे आदिदेवा! हे जगत्पते! माघ मासाच्या कृष्ण पक्षात कोणती एकादशी येते? ती कशा प्रकारे करावी? तिचे फळ काय असते? हे महाप्राज्ञ! कृपया याविषयी आपण काही सांगा.”

भगवान श्रीकृष्ण म्हणाले, “हे नृपश्रेष्ठ! माघ मासाच्या कृष्ण पक्षातील एकादशी ‘षट्तिला’ नावाने विख्यात आहे. सर्व पापांचे हरण करणाऱ्या या एकादशीची कथा मुनिश्रेष्ठ पुलस्त्यांनी दाल्भ्याला सांगितली होती. ती कथा तूही ऐक.”

दाल्भ्याने विचारले, “हे मुनिवर्य! मृत्युलोकात राहणारा प्रत्येक जीव पापकर्मात रत आहे. त्यांना नरकयातनेतून वाचवण्यासाठी कोणता उपाय आहे, कृपया तो आपण सांगा.”

पुलस्त्य म्हणू लागले, “हे महाभाग! तू चांगली गोष्ट विचारलीस, तर ऐक. माघ मासात मनुष्याने स्नान करून इंद्रियांना संयमात ठेवून काम, क्रोध, अहंकार, लोभ व निंदेचा त्याग करावा. देवाधिदेव भगवंतांचे स्मरण करत पाण्याने पाय धुऊन भूमीवर पडलेले गायीचे शेण गोळा करून त्यात तीळ व कापूस मिसळून एकशे आठ पिंड बनवावेत. माघ मासात आर्द्रा-मूळ नक्षत्र येताच कृष्ण पक्षातील एकादशीचे व्रत धारण करावे. स्नानाने पवित्र होऊन शुद्ध भावाने श्रीविष्णूंची पूजा करावी. अपराधक्षमेसाठी श्रीकृष्ण नामाचा उच्चार करावा. रात्री होम व जागरण करावे. चंदन, कापूर, अरभजा व नैवेद्य दाखवून शंख, चक्र, पद्म व गदा धारण करणाऱ्या श्रीहरींची पूजा करावी. वारंवार श्रीकृष्णाच्या नामासह भोपळा, नारळ व महाळुंगाची फळे अर्पण करून विधिपूर्वक अर्घ्य द्यावे. इतर सामग्रीचा अभाव असल्यास शंभर सुपाऱ्यांचा उपयोग करूनही पूजन व अर्घ्यदान करता येते.

अर्घ्य मंत्र असा आहे :—

कृष्ण कृष्ण कृपालुस्त्वमगतीनां गतिर्भव। संसारार्णवमग्नानां प्रसीद पुरूषोत्तम॥ नमस्ते पुंडरीकाक्ष नमस्ते विश्वभावन। सुब्रह्मण्य नमस्तेऽस्तु महापुरूष पूर्वज॥ गृहाणार्घ्यं मया दत्तं लक्ष्म्या सह जगत्पते।

सच्चिदानंद श्रीकृष्णा, आपण फार दयाळू आहात. आम्हा अनाथ जीवांचे आश्रयदाते आपण आहात. हे पुरुषोत्तमा! आम्ही या संसारसागरात बुडत आहोत, कृपया आमच्यावर प्रसन्न व्हा. हे विश्वभावना! आपल्याला आमचे वंदन आहे. हे कमलनयना! आपल्याला प्रणाम आहे. हे सुब्रह्मण्यम्! हे महापुरुषा! हे सर्वांच्या पूर्वजा! आपल्याला प्रणाम आहे. हे जगत्पते! लक्ष्मीसह आपण या अर्घ्याचा स्वीकार करा.

त्यानंतर ब्राह्मणांची पूजा करून त्यांना पाण्याने भरलेला घडा द्यावा. सोबत छत्री, पादत्राणे व वस्त्रेही अर्पण करावीत. ‘या दानाने भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होवोत’ असे म्हणत दान करावे. आपल्या परिस्थितीनुसार श्रेष्ठ ब्राह्मणाला काळी गाय दानात द्यावी. हे द्विजश्रेष्ठ! विद्वान पुरुषाने तिळांनी भरलेले पात्र दान करावे. तिळाच्या दानाने व्यक्ती हजारो वर्षे स्वर्गात वास करते.

तिलस्नायी तिलोद्वर्ती तिलहोमी तिलोदकी। तिलदाता च भोक्ता च षट्तिला पापनाशिनी॥

तिळाने स्नान करणे, तिळाचे उटणे लावणे, तिळाचा होम करणे, तीळ घातलेले पाणी पिणे, तीळ दान करणे, तिळाचा भोजनात उपयोग करणे — अशा प्रकारे सहा कार्यांत तिळाचा उपयोग केल्याने हिला ‘षट्तिला’ एकादशी मानले जाते, जी पापहारिणी आहे.

एकदा षट्तिला एकादशीचा महिमा ऐकण्यासाठी देवर्षी नारद भगवान श्रीकृष्णांकडे आले. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, “एक ब्राह्मण स्त्री होती. ब्रह्मचर्याचे पालन करत ती भगवंतांची आराधना करत असे. अनेक प्रकारच्या तपस्यांमुळे ती फार दुर्बळ झाली होती. तिने पुष्कळ दाने दिली, परंतु तिने ब्राह्मण व देवतांना अन्नदान केले नव्हते. अनेक प्रकारची व्रते व तपस्या केल्याने ती शुद्ध झाली होती, परंतु भुकेल्या लोकांना तिने कधीही अन्नदान केले नव्हते. हे ब्राह्मणा! तिची परीक्षा घेण्यासाठी मी ब्राह्मणाच्या रूपात त्या साध्वीच्या घरी जाऊन भिक्षा मागितली.

तेव्हा त्या ब्राह्मणीने विचारले, “हे ब्राह्मणा! सत्य सांगा की आपण कोठून आला आहात?” मी ऐकूनही अनोळखी असल्याचे भासवत तिला उत्तर दिले नाही. तिने क्रोधाने भिक्षापात्रात माती घातली. त्यानंतर मी माझ्या धामाला परतलो. आपल्या तपस्येच्या प्रभावाने ब्राह्मणी माझ्या धामात परत आली. तिला संपत्तिहीन, सुवर्णहीन, धान्यहीन असा केवळ एक सुंदर महाल मिळाला. त्या महालात काहीच न मिळाल्याने ती अस्वस्थ व क्रोधित होऊन माझ्याकडे आली आणि विचारू लागली, “हे जनार्दना! सर्व व्रते व तपस्या करून मी श्रीविष्णूंची आराधना केली, परंतु मला धनधान्य का प्राप्त झाले नाही?”

मी म्हणालो, “हे साध्वी! तू भौतिक विश्वातून इथे आली आहेस. आता तू आपल्या घरी परत जा. तुला भेटायला देवतांच्या पत्नी येतील; त्यांना षट्तिला एकादशीचा महिमा विचारून पूर्ण ऐकल्यानंतरच दरवाजा उघड, अन्यथा नाही.” हे ऐकून ब्राह्मणी घरी परत आली.

एकदा ब्राह्मणी दरवाजा बंद करून आत बसली होती, तेव्हा देवपत्नी तिथे येऊन म्हणू लागल्या, “हे सुंदरी! हे ब्राह्मणी! आम्ही तुझे दर्शन घेण्यासाठी आलो आहोत, कृपया दरवाजा उघड.” तेव्हा ब्राह्मणीने सांगितले, “आपल्याला मला पाहण्याची इच्छा असेल तर कृपया षट्तिला एकादशीच्या महिम्याचे वर्णन करा, तरच मी दरवाजा उघडेन.” त्या वेळी एका देवपत्नीने तिला ते माहात्म्य सांगितले. माहात्म्य ऐकल्यानंतर ब्राह्मणीने दरवाजा उघडला; देवपत्नी तिच्या दर्शनाने फार प्रसन्न झाल्या.

देवपत्नींच्या सांगण्यानुसार ब्राह्मणीने षट्तिला एकादशीचे व्रत केले. त्याच्या प्रभावाने तिला धनधान्य, तेज व सौंदर्य प्राप्त झाले. धनधान्य मिळवण्याच्या लोभदृष्टीने हे व्रत करू नये. या व्रताच्या पालनाने आपोआप गरिबी व दुर्भाग्य नष्ट होते. जो कोणीही या तिथीला तीळ दान करील तो सर्व पापांतून मुक्त होईल.

६. जया एकादशी

भविष्योत्तर पुराणात भगवान श्रीकृष्ण व महाराज युधिष्ठिर यांच्या संवादात या एकादशीचे वर्णन येते. युधिष्ठिर महाराजांनी विचारले, “हे जनार्दना! माघ मासाच्या शुक्ल पक्षातील एकादशीला काय संबोधतात? हे व्रत कसे करावे? कोणत्या देवतेची पूजा करावी?”

भगवान श्रीकृष्णांनी उत्तर दिले, “राजेंद्रा! ऐक! माघ मासाच्या शुक्ल पक्षातील एकादशीला जया एकादशी म्हणतात. सर्व पापांचे हरण करून मोक्ष देणारी ही उत्तम तिथी आहे. जो कोणीही या व्रताचे पालन करील त्याला पिशाचयोनी प्राप्त होणार नाही, म्हणून प्रयत्नपूर्वक या ‘जया’ एकादशीचे पालन करावे.”

प्राचीन काळी स्वर्गात देवराज इंद्राचे राज्य होते. देवगण अप्सरांसह पारिजात वृक्षाने शोभित नंदनवनात विहार करत होते. पन्नास कोटी गंधर्वांचा नायक देवराज इंद्राने आपल्या इच्छेने वनात विहार करताना नृत्याचे आयोजन केले होते. गंधर्वांमध्ये प्रमुख पुष्पदंत, चित्रसेन आणि त्याचा पुत्र — हे तिघे होते.

चित्रसेनाच्या पत्नीचे नाव ‘मालिनी’ होते. मालिनी व चित्रसेनाची कन्या ‘पुष्पवंती’ होती. पुष्पदंत गंधर्वाचा पुत्र ‘माल्यवान’ होता. माल्यवान पुष्पवंतीच्या सौंदर्यावर मोहित झाला होता. हे दोघेही इंद्राच्या प्रसन्नतेसाठी नृत्य करण्यास आले होते. हे दोघेही इतर अप्सरांसह आनंदाने गायन करत होते. परंतु एकमेकांवरील अनुरागदृष्टीमुळे ते मोहित झाले आणि त्यांचे मन विचलित झाले; त्यामुळे त्यांना शुद्ध गायन करता आले नाही. कधी ताल चुकत तर कधी गायन थांबत असे. या गोष्टीने क्रोधित व अपमानित होऊन इंद्राने शाप दिला, “तुम्ही दोघे पतित आहात. मूर्ख आहात. तुमचा धिक्कार असो. माझ्या आज्ञेचा भंग केल्याच्या फलस्वरूप तुम्ही पतिपत्नीच्या रूपात पिशाचयोनीत जन्म घ्याल.”

इंद्राकडून असा शाप मिळताच दोघे फार दुःखी झाले. हिमालयात जाऊन पिशाचयोनी प्राप्त होऊन ते भयंकर दुःख भोगत राहिले. शारीरिक पातकातून प्राप्त झालेल्या या योनीने पीडित होऊन ते पर्वताच्या गुहेत भ्रमण करत होते. एके दिवशी पिशाच पतीने आपल्या पत्नीला विचारले, “आपण असे कोणते पाप केले आहे ज्यासाठी आपल्याला ही योनी मिळाली? नरकयातना तर दुःखदायक आहेतच, पण पिशाचयोनीतही दुःख फार भयानक आहे. म्हणून पूर्ण प्रयत्नाने या पापातून सुटका मिळवली पाहिजे.”

दोघे चिंतेत मग्न होते. परंतु भगवंतांच्या कृपेने त्यांना माघ महिन्यातील एकादशी तिथी प्राप्त झाली. ‘जया’ नावाने प्रसिद्ध असलेली ही तिथी सर्व तिथींमध्ये उत्तम आहे. या तिथीला त्यांनी अन्न ग्रहण केले नाही, जल ग्रहण केले नाही, कोणत्याही जीवाची हत्याही केली नाही आणि कोणतेही फळ खाल्ले नाही. दुःखाने व्याकूळ होऊन सूर्यास्तापर्यंत ते वडाच्या झाडाखाली बसून राहिले. भयानक रात्र त्यांच्यासमोर उपस्थित झाली, पण त्यांना झोपही आली नाही. कोणत्याही प्रकारचे सुख व कामसुखही त्यांनी भोगले नाही. रात्र संपून सूर्योदय झाला. द्वादशीचा दिवस उजाडला. त्यांच्याकडून ‘जया’ एकादशीच्या व्रताचे पालन घडले होते, त्यांनी रात्रभर जागरण केले होते. व्रताच्या प्रभावाने आणि भगवान विष्णूंच्या शक्तीमुळे दोघे या योनीतून मुक्त होऊन आपल्या पूर्वरूपाला प्राप्त झाले.

त्यांच्या हृदयात पुन्हा पूर्वीचा अनुराग उत्पन्न झाला. अलंकारांनी शोभित होऊन विमानात विराजमान होऊन ते स्वर्गलोकात गेले. देवराज इंद्रासमोर प्रसन्नतेने जाऊन त्यांनी सादर प्रणाम केला. त्यांना पूर्वरूपात पाहून इंद्राला आश्चर्य वाटले आणि त्याने विचारले, “कोणत्या पुण्याच्या प्रभावाने तुम्ही पिशाचयोनीतून मुक्त झालात? माझ्याकडून शाप मिळूनही तुम्ही कोणत्या देवतेच्या आश्रयाने शापमुक्त झालात?”

माल्यवान म्हणाला, “हे स्वामी! भगवान वासुदेवांच्या कृपेने तसेच ‘जया’ एकादशीच्या व्रताने आम्ही पिशाचयोनीतून मुक्त झालो.”

देवराज इंद्र म्हणाला, “आता माझ्या सांगण्यानुसार तुम्ही दोघे सुधापान करा. जे लोक भगवान वासुदेवांना शरण जातात आणि एकादशीचे पालन करतात ते आम्हांलाही पूजनीय आहेत.”

भगवान श्रीकृष्ण म्हणाले, “हे राजन्! म्हणून एकादशीचे व्रत करावे. हे नृपश्रेष्ठ! ‘जया’ एकादशी ब्रह्महत्येच्या पातकातूनही मुक्त करते. ज्याने ‘जया’ एकादशीच्या व्रताचे पालन केले, त्याने सर्व प्रकारचे दान तसेच यज्ञांचे अनुष्ठान केल्यासारखेच आहे. हिचा महिमा वाचल्याने अथवा ऐकल्याने अग्निष्टोम यज्ञाचे फळ प्राप्त होते.”

७. विजया एकादशी

स्कंद पुराणात या एकादशीच्या महिम्याचे वर्णन केले आहे.

महाराज युधिष्ठिरांनी विचारले, “हे वासुदेवा! फाल्गुन मासाच्या कृष्ण पक्षात कोणती एकादशी येते? कृपया आपण मला सांगा.”

भगवान श्रीकृष्ण म्हणाले, “हे युधिष्ठिरा! एकदा कमळावर विराजमान ब्रह्मदेवांना नारदांनी विचारले, ‘हे सुरश्रेष्ठ! फाल्गुन मासाच्या कृष्ण पक्षात विजया एकादशी येते. तिचे पालन केल्याने कोणते पुण्य प्राप्त होते याविषयी आपण मला सांगा.’

ब्रह्मदेव म्हणाले, “हे नारदा! ऐक, मी तुला एक कथा सांगतो, जी सर्व पापांचे हरण करणारी आहे. हे व्रत फार प्राचीन व पवित्र आहे. ही विजया एकादशी राजांना विजय प्रदान करणारी आहे. फार पूर्वी जेव्हा राजा रामचंद्र चौदा वर्षांसाठी वनात गेले होते, तेव्हा ते पंचवटीत सीता व लक्ष्मणासह निवास करत होते. तिथून रावणाने सीताहरण केले. या दुःखाने त्यांना व्याकुळता आली. सीतेच्या शोधात वनोवनी भटकत असताना त्यांना जटायू भेटला जो मरणासन्न होता. त्यानंतर त्यांनी वनात कबंध राक्षसाचा वध केला. सुग्रीवाशी मैत्री करून श्रीरामचंद्रांनी वानरसेना संघटित केली. हनुमान श्रीरामचंद्रांची मुद्रा घेऊन लंकेत गेले आणि सीतेचा शोध घेऊन परतले. तिथून परतल्यावर लंकावृत्तान्त सांगितल्यानंतर सुग्रीवाची अनुमती घेऊन श्रीरामचंद्रांनी लंकेला जाण्याचे निश्चित केले. सागरतीरी आल्यावर ते लक्ष्मणाला म्हणू लागले, “हे सुमित्रानंदन! या अगाध सागरात अनेक भयानक जीवजंतू आहेत. हा सहजपणे कसा पार करावा, याचा कोणताही उपाय सुचत नाही.”

लक्ष्मण म्हणाला, “महाराज! आपणच आदिदेव आणि पुराणपुरुष पुरुषोत्तम आहात. आपल्यापासून काहीही लपवणे असंभव आहे. या द्वीपात प्राचीन काळापासून बकदाल्भ्य मुनी राहतात. जवळच त्यांचा आश्रम आहे. हे रघुनंदन! त्यांना या समस्येचे समाधान विचारू.”

लक्ष्मणाच्या सांगण्यानुसार प्रभू रामचंद्र मुनिवर्य बकदाल्भ्यांना भेटण्यासाठी त्यांच्या आश्रमात गेले आणि त्यांना सादर प्रणाम केला. तेव्हा मुनिवर्यांनी ओळखले की हेच परमपुरुषोत्तम श्रीराम आहेत. अत्यंत आनंदाने त्यांनी विचारले, “श्रीराम, आपले आगमन कशासाठी झाले?”

रामचंद्र म्हणाले, “हे मुनिवर्य! रावणाचा संहार करण्यासाठी मी इथे आलो आहे. कृपा करून हा सागर पार करण्याचा उपाय सांगा.”

बकदाल्भ्य म्हणाले, “हे श्रीराम! फाल्गुन मासाच्या कृष्ण पक्षातील विजया एकादशीच्या पालनाने विजय मिळतो. हे राजन्! या व्रताची विधी अशी आहे. दशमीच्या दिवशी सोन्याच्या, चांदीच्या, पितळेच्या, तांब्याच्या अथवा मातीच्या एका कलशाची स्थापना करावी. त्यात पाणी भरून पाने घालावीत. त्यावर भगवान नारायणाच्या सुवर्णमय विग्रहाची स्थापना करावी. एकादशीच्या दिवशी प्रातःकाळी उठून स्नान करावे. त्यानंतर पुष्पमाळा, चंदन, सुपारी, नारळ अर्पण करून त्या कलशाची पूजा करावी. दिवसभर कलशासमोर बसून कथा करावी, सोबतच जागरणही करावे. तुपाचा दिवा लावल्याने व्रताची अखंड सिद्धी प्राप्त होते. त्यानंतर द्वादशीच्या दिवशी नदी किंवा तलावाच्या काठी त्या कलशाची विधिवत पूजा करून तो कलश ब्राह्मणाला दान करावा. महाराज! कलशासोबत आणखीही मोठमोठी दाने करावीत. हे श्रीराम! आपण या व्रताचे पालन करा, यामुळे आपल्याला विजय प्राप्त होईल.”

ब्रह्मदेव म्हणू लागले, “हे नारदा! मुनिवर्यांच्या सांगण्यानुसार प्रभू श्रीरामचंद्रांनी विजया एकादशीचे व्रत केले. त्या व्रताच्या प्रभावाने श्रीरामचंद्र विजयी झाले. हे पुत्रा! या व्रताच्या प्रभावाने मनुष्याला या जीवनात विजय प्राप्त होतो आणि अक्षय परलोक प्राप्त होतो!”

भगवान श्रीकृष्ण म्हणाले, “या एकादशीचे पालन करावे! हिचे माहात्म्य ऐकल्याने वाजपेय यज्ञाचे फळ मिळते.”

८. आमलकी एकादशी

या एकादशीचे माहात्म्य ब्रह्मांड पुराणात सांगितले आहे.

युधिष्ठिर महाराजांनी विचारले, “हे श्रीकृष्णा! फाल्गुन मासाच्या शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय आहे? हे व्रत कशा प्रकारे करावे, कृपया आपण सांगा.”

भगवान श्रीकृष्ण म्हणाले, “हे धर्मनंदन! प्राचीन काळी मांधाता राजाने वसिष्ठ ऋषींना याविषयी विचारले होते. हिला आमलकी एकादशी म्हणतात आणि जो कोणीही या व्रताचे पालन करतो त्याला विष्णुलोक अथवा वैकुंठाची प्राप्ती होते.”

राजा मांधात्याने विचारले, “हे ऋषिवर्य! पृथ्वीवर हिचा आरंभ कधी झाला याविषयी आपण मला सांगा.”

वसिष्ठ ऋषी म्हणू लागले, “हे महाभाग! पृथ्वीवर या आमलकीच्या प्रारंभाची कथा ऐक. आमलकी हा महान वृक्ष आहे जो सर्व पापांचा नाश करतो. भगवान विष्णूंच्या मुखातील बिंदूतून चंद्रासमान एक बिंदू प्रकट झाला. तो बिंदू पृथ्वीवर पडला व त्यातून वृक्ष उत्पन्न झाला, ज्याला आमलकी हे नाव मिळाले. सर्व वृक्षांमध्ये हा आदिवृक्ष मानला जातो. त्याच वेळी सर्व सृष्टीचे निर्माते ब्रह्मदेवांचीही उत्पत्ती झाली. त्यांच्यापासूनच सर्व प्रजेची सृष्टी झाली, ज्यात देवता, गंधर्व, यक्ष, राक्षस, नाग तसेच पवित्र व शुद्ध हृदयाच्या महर्षींचा जन्म झाला. त्यांच्यापैकी देवता व ऋषिलोक विष्णुप्रिया आमलकी वृक्षाजवळ आले. हे महाभाग्यवान! तो वृक्ष पाहताच देवतांना फार आश्चर्य वाटले आणि एकमेकांकडे पाहून ते विचार करू लागले — पळस आदी वृक्ष आम्ही ओळखतो, पण हा वृक्ष आम्ही प्रथमच पाहत आहोत. त्यांना या स्थितीत पाहून आकाशवाणी झाली, “हे महर्षींनो, हा आमलकी वृक्ष आहे, जो श्रीविष्णूंना अति प्रिय आहे. केवळ याच्या स्मरणाने गोदानाचे पुण्य प्राप्त होते. नेहमी आवळा खावा. सर्व पापांचा नाश करणारा हा वैष्णव वृक्ष आहे.”

तस्या मूले स्थितो विष्णुस्तदूर्ध्वं च पितामहः। स्कन्धे च भगवान रुद्रः संस्थितः परमेश्वरः॥ शाखासु मुनयः सर्वे प्रशाखासु च देवताः॥ पर्णेषु वसवो देवाः पुष्पेषु मरुतस्तथा॥ प्रजानां पतयः सर्वे फलेष्वेव व्यवस्थिताः। सर्वदेवमयी ह्येषा धात्री च कथिता मया॥

या वृक्षाच्या मुळात विष्णू, अग्रभागी ब्रह्मदेव, स्कंधात शिव, शाखांमध्ये मुनी, प्रशाखांमध्ये देवता, पानांमध्ये वसू, फुलांमध्ये मरुद्गण तसेच फळांमध्ये सर्व प्रजापती वास करतात. म्हणून आमलकी वृक्षाला सर्वदेवमय म्हटले जाते. म्हणूनच तो सर्व विष्णुभक्तांना प्रिय आहे.

ऋषी म्हणाले, “हे अव्यक्त महापुरुषा, आपण कोण आहात? आम्ही आपल्याला कोणती देवता समजावे? कृपया आपण आम्हांला सांगा.”

पुन्हा आकाशवाणी झाली, “जो सर्व जीवांचा कर्ता, सर्व भुवनांचा स्रोत आहे आणि विद्वान पुरुषांनाही अगम्य आहे, तो मीच विष्णू आहे.” देवादिदेव भगवान विष्णूंचे कथन ऐकून सर्व ब्रह्मपुत्र आश्चर्यचकित होऊन मोठ्या भक्तिभावाने श्रीविष्णूंची स्तुती करू लागले.

ऋषी म्हणाले, “सर्व जीवांचे आत्मभूत आत्मा व परमात्मा अशा आपल्याला प्रणाम करतो. ज्यांचे कधीही पतन होत नाही त्या अच्युताला आम्ही नमस्कार करतो. दामोदर, यज्ञेश्वर आणि परमपरमेश्वर अशा आपल्याला आमचा प्रणाम आहे. आपण मायापती आणि संपूर्ण विश्वाचे स्वामी आहात, आपल्याला आमचे वंदन आहे.”

अशा प्रकारे ऋषींनी केलेली स्तुती ऐकून भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि म्हणू लागले, “हे महर्षींनो! मी तुम्हांला कोणता अभीष्ट वर देऊ?”

ऋषी म्हणाले, “हे भगवंता! आपण खरोखर आमच्यावर प्रसन्न असाल तर जे व्रत केल्याने मोक्ष मिळतो ते आम्हांला सांगा.”

श्रीविष्णू म्हणाले, “हे महर्षींनो! फाल्गुन शुक्ल पक्षात जर पुष्य नक्षत्रयुक्त द्वादशी असेल तर ती सर्व पापे नष्ट करणारी असेल. हे द्विजवर! त्या दिवशी विशेष कर्तव्य करावे, त्याविषयी ऐका. आमलकी एकादशीला रात्रभर आमलकी वृक्षाजवळ जाऊन जागरण करावे. त्याने मनुष्याला सर्व पापांतून मुक्ती तसेच सहस्र गायी दान केल्याचे पुण्यही मिळते. हे विप्रगण! सर्व व्रतांमध्ये हे उत्तम व्रत आहे.”

ऋषींनी विचारले, “हे भगवंता! कृपया या व्रताची विधी सांगा. हे कसे पूर्ण करावे? याचे अधिष्ठाता कोण आहेत? या दिवशी स्नान, दान आदी विधी कशा प्रकारे कराव्यात? पूजेची विधी काय आहे? त्यासाठी मंत्र काय आहे? कृपया यथार्थ रूपाने याचे वर्णन करा.”

भगवान श्रीविष्णू म्हणाले, “हे द्विजवर, ऐका! एकादशीच्या दिवशी प्रातःकाळी लवकर उठावे. दंतधावन केल्यानंतर संकल्प करावा की, हे पुंडरीकाक्ष! हे अच्युत! आज मी निराहार एकादशी करून उद्या भोजन ग्रहण करीन. कृपया मला आपल्या चरणी आश्रय द्या.” अशा प्रकारे नियम ग्रहण केल्यानंतर पापी, पतित, चोर, पाखंडी, दुराचारी, मर्यादाभंग करणारे, गुरुपत्नीगामी अशा व्यक्तींशी संभाषण करू नये. आपले मन वश ठेवून नदी, तलाव, विहीर किंवा घरात स्नान करावे. स्नान करण्यापूर्वी शरीराला माती लावावी. माती लावताना हा मंत्र म्हणावा.

अश्वक्रान्ते रथक्रान्ते विष्णुक्रान्ते वसुन्धरे। मृत्तिके हर मे पापं जन्मकोट्यां समर्जितम्॥

हे वसुंधरे! आपण आपल्यावरून अश्व व रथ चालणे नेहमी सहन करता. भगवान वामनदेवांनीही आपल्या पावलांनी आपल्याला मोजले आहे. हे मृत्तिके, मी कोट्यवधी जन्मांत अनेक पापे केली आहेत, कृपया त्या सर्व पापांचे आपण हरण करा.

स्नान मंत्र

त्वं मातः सर्वभूतानां जीवनं तत्तु रक्षकम्। स्वेदजोद्भिज्जजातीनां रसनां पतये नमः॥ स्नातोऽहं सर्वतीर्थेषु हृदयप्रस्रवणेषु च। नदीषु देवखातेषु इदं स्नानं तु मे भवेत्॥

हे जलाधिष्ठात्री देवी! हे माते! तू सर्व जीवांचे जीवन आहेस. तेच जीवन जे स्वेदज व उद्भिज जातीच्या जीवांचे रक्षक आहे. तू रसस्वामिनी आहेस, तुला आमचे वंदन आहे. आज मी सर्व तीर्थांत, कुंडात, तलावात आणि देवतासंबंधी सरोवरात स्नान केले आहे. माझे हे स्नान वर सांगितलेल्या सर्व स्नानांचे फळ देणारे होवो.

विद्वान पुरुषाने परशुरामाची सोन्याची प्रतिमा बनवावी. ती आपल्या शक्तीनुसार एक अथवा अर्ध्या तोळ्याची असावी. स्नानानंतर घरात पूजा व हवन करावे. त्यानंतर पूजेची सर्व सामग्री घेऊन आमलकी वृक्षाजवळ जावे. वृक्षाजवळील जागेची साफसफाई करून शेणाने सारवावी. अशा प्रकारे शुद्ध भूमीवर मंत्रपठणाद्वारे नव्या कुंभाची स्थापना करावी. त्या कलशात पंचरत्ने तसेच चंदन घालून पांढऱ्या चंदनाने त्याला सजवावे. कंठात फुलांची माळ घालून सुगंधी धूप अर्पण करावा. दीप प्रज्वलित करावा; याचा उद्देश हाच की सर्व प्रकारचे मनोहर, सुशोभित दृश्य निर्माण व्हावे. पूजेसाठी नवी छत्री, पादत्राणे व वस्त्र घ्यावे. कलशावर एक पात्र ठेवून त्यात दिव्य लाह्या भराव्यात. त्यावर सुवर्णमय परशुरामांची स्थापना करावी. विशोकाय नमः असे म्हणून त्यांच्या चरणांची, विश्वरूपिणे नमः म्हणून त्यांच्या गुडघ्यांची, उग्राय नमः म्हणून त्यांच्या मांड्यांची, दामोदराय नमः म्हणून त्यांच्या कटिभागाची, पद्मनाभाय नमः ने उदराची, श्रीवत्सधारिणे नमः ने वक्षःस्थळाची, चक्रिणे नमः ने त्यांच्या डाव्या हाताची, गदिने नमः ने उजव्या हाताची, वैकुण्ठाय नमः ने कंठाची, यज्ञमुखाय नमः ने मुखाची, विशोकनिधये नमः ने नासिकेची, वासुदेवाय नमः ने डोळ्यांची, वामनाय नमः ने ललाटाची, सर्वात्मने नमः ने मस्तक व सर्व अंगांची पूजा करावी.

नमस्ते देवदेवेश जामदग्न्य नमोऽस्तु ते। गृहणार्घ्यमिमं दत्तमामलक्या युतं हरे॥

हे देवदेवेश्वर! हे जमदग्निनंदन! आपल्याला माझे सादर वंदन आहे. आमलकीसह या अर्घ्याचा आपण स्वीकार करा.

त्यानंतर भक्तिभावाने जागरण करावे. नृत्य, संगीत, वाद्य, धार्मिक उपाख्याने तसेच श्रीविष्णूंसंबंधीच्या कथावार्ता करत ती रात्र घालवावी. भगवान विष्णूंचे नामस्मरण करत आमलकी वृक्षाच्या १०८ अथवा २८ प्रदक्षिणा घालाव्यात. प्रातःकाळ होताच श्रीहरींची आरती करावी. श्री परशुरामाच्या स्वरूपात विष्णू माझ्यावर प्रसन्न राहोत या भावनेने ब्राह्मणांची पूजा करून तेथील सर्व सामग्री त्यांना दान करावी.

त्यानंतर आमलकी वृक्षाची प्रदक्षिणा करून, स्नान करून ब्राह्मणांना भोजन घालावे. त्यानंतर परिवारासह स्वतः भोजन ग्रहण करावे. असे केल्याने जे पुण्य प्राप्त होते त्याविषयी ऐका. सर्व तीर्थांत स्नान केल्याने, सर्व प्रकारचे दान केल्याने जे प्राप्त होते तेच पुण्य वरील विधीचे पालन केल्याने प्राप्त होते. सर्व यज्ञ पूर्ण केल्याने जे पुण्य मिळते त्याहूनही अधिक पुण्यप्राप्ती या व्रताने होते. यात किंचितही संशय नाही. वसिष्ठ ऋषी म्हणाले, “हे राजन्! इतके सांगून भगवान विष्णू अंतर्धान पावले. तेव्हा सर्व महर्षींनी या व्रताचे पालन केले. त्याचप्रमाणे आपणही या व्रताचे अनुष्ठान करावे.”

भगवान श्रीकृष्ण म्हणाले, “हे राजन्! हे दुर्धर्ष व्रत सर्व पापांतून मनुष्याला मुक्त करते.”

९. पापमोचनी एकादशी

भविष्योत्तर पुराणात भगवान श्रीकृष्ण व महाराज युधिष्ठिर यांच्या संवादांत पापमोचनी एकादशीचे वर्णन येते.

एकदा युधिष्ठिर महाराज भगवान श्रीकृष्णांना म्हणू लागले, “हे केशवा! आमलकी एकादशीच्या वर्णनानंतर चैत्र मासाच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या पापमोचनी एकादशीचे कृपया कथन करा.”

भगवान श्रीकृष्ण म्हणाले, “हे राजन्! पुष्कळ वर्षांपूर्वी लोमश ऋषींनी राजा मांधात्याला या पापमोचनी एकादशीचा महिमा सांगितला होता. या एकादशी व्रताच्या पालनाने मनुष्य सर्व पापांतून मुक्त होतो आणि जीवनातील अनेक प्रकारच्या वाईट अनुभवांतून मुक्त होऊन अष्टसिद्धी प्राप्त करतो.”

लोमश ऋषी म्हणाले, “फार पूर्वी देवतांचा कोषाध्यक्ष कुबेराचे अतिशय सुंदर चैतरथ नावाचे एक मनोहर उपवन होते. विशेषकरून वर्षभर वसंत ऋतूसारखेच त्या उपवनाचे वातावरण असे. म्हणूनच स्वर्गकन्या, किन्नर, अप्सरा व गंधर्व नेहमी विहारासाठी तिथे येत असत. विशेषकरून देवेंद्र व इतर देवताही तिथे येऊन आनंद व प्रेमाची देवाणघेवाण करत असत. त्याच उपवनात शिवाचे परमभक्त मेधावी नामक ऋषी तपस्या करत होते, ज्यांची तपस्या अनेक प्रकारे भंग करण्याचा प्रयत्न स्वर्गातील अप्सरा करत असत.

मंजुघोषा अप्सरेने त्यांचा तपोभंग करण्याचा निश्चय केला. तिने ऋषींच्या आश्रमाजवळच कुटी बांधली आणि अतिशय मधुर स्वरात गाणे गाऊ लागली. त्याच वेळी शिवाचा शत्रू कामदेवही शिवभक्त मेधावी ऋषींना जिंकण्याचा प्रयत्न करू लागला. शिवाने कामदेवाला एकदा भस्म केले होते; त्याचाच प्रतिशोध घेण्यासाठी कामदेवाने ऋषींच्या शरीरात प्रवेश केला. शुभ्र उपवीत धारण केलेले मेधावी ऋषी च्यवन महर्षींच्या आश्रमात वास करत होते. कामदेवाच्या शरीरप्रवेशामुळे मेधावी ऋषीही कामदेवासारखेच सुंदर दिसू लागले. त्याच वेळी कामासक्त मंजुघोषा त्यांच्यासमोर आली. मेधावी ऋषीही कामाने घायाळ झाले. त्यांना शिवाच्या उपासनेचा विसर पडला आणि ते स्त्रीसंगात पूर्णपणे मग्न राहिले. स्त्रीसंगात त्यांना दिवसरात्रीचाही विसर पडला. अशा प्रकारे अनेक वर्षे मेधावी ऋषींनी कामक्रीडेत घालवली.

त्यानंतर मंजुघोषेला कळले की मेधावी ऋषींचे पतन झाले आहे आणि तिने आता स्वर्गात परतले पाहिजे. प्रणयात मग्न ऋषींना ती म्हणू लागली, “हे ऋषिवर! कृपया मला स्वर्गलोकात परतण्याची अनुमती द्या.” त्यावर मेधावी ऋषींनी उत्तर दिले, “हे सुंदरी! आज संध्याकाळीच तू माझ्याजवळ आली आहेस; आज रात्र इथे राहून सकाळी तू परत जा.” मंजुघोषा अशा प्रकारे आणखी काही वर्षे तिथे राहिली, जो ५७ वर्षे ९ महिने ३ दिवसांचा काळ होता; परंतु ऋषींसाठी हा काळ केवळ अर्ध्या रात्रीसमान होता. पुन्हा स्वर्गात जाण्याची अनुमती मागितल्यावर ऋषी म्हणाले, “हे सुंदरी! आता प्रातःकाळ होत आहे, माझ्या प्रातर्विधीनंतर तू जा.” तेव्हा अप्सरा हसत म्हणू लागली, “हे ऋषिवर! प्रातर्विधीला आपल्याला किती वेळ लागेल? अजूनही आपल्याला तृप्ती आली नाही? माझ्या संगतीत आपण किती वर्षे घालवली आहेत? म्हणून कृपया काळाचे भान ठेवा.”

हे शब्द ऐकताच मेधावी ऋषींनी वर्षांची गणना केली आणि म्हणाले, “अरेरे! हे सुंदरी! मी माझ्या जीवनाची ५७ वर्षे व्यर्थ घालवली. तू माझे जीवन व तपस्या या दोन्हींचा नाश केलास.” ऋषींच्या डोळ्यांत अश्रू आले आणि त्यांनी मंजुघोषेला शाप दिला, “हे दुष्टे! तुझा धिक्कार असो! तू माझ्याशी चेटकिणीसारखे वर्तन केले आहेस, म्हणून तू चेटकीण हो.”

ऋषींकडून शाप मिळाल्यावर मंजुघोषा म्हणाली, “हे द्विजवर! कृपया हा कठोर शाप आपण मागे घ्या. आपण बराच काळ माझ्यासोबत राहिलात. हे स्वामी! कृपया दया करा.” यावर मेधावी ऋषी म्हणू लागले, “हे देवी! मी आता काय करू? तू माझ्या तपोशक्तीचा तसेच तपोधनाचा नाश केला आहेस. तरीही या शापातून मुक्त होण्याचा उपाय ऐक. चैत्र मासाच्या कृष्ण पक्षात जी पापमोचनी एकादशी येते त्या दिवशी या एकादशी व्रताचे कठोर पालन केल्याने या पिशाचयोनीतून तुला मुक्ती मिळेल.”

इतके सांगून मेधावी ऋषी आपले पिता च्यवन ऋषींच्या आश्रमात परतले. आपल्या पतित पुत्राला पाहून च्यवन ऋषींना फार दुःख झाले. ते म्हणू लागले, “हे पुत्रा! तू हे काय केलेस? एका स्त्रीसाठी आपली तपस्या नष्ट केलीस. स्वतःचाच नाश करून घेतलास?” त्यावर मेधावी ऋषी म्हणाले, “मी दुर्दैवाने एका अप्सरेचा संग करून फार मोठे पातक केले. कृपा करून या पापाचे योग्य प्रायश्चित्त सांगा.” पश्चात्तापदग्ध पुत्राचे शब्द ऐकल्यानंतर च्यवन महर्षी म्हणाले, “चैत्र मासाच्या कृष्ण पक्षातील पापमोचनी एकादशीच्या व्रतपालनाने तू पापमुक्त होशील.”

“उत्साहाने व कठोरपणे मेधावी ऋषींनी त्या व्रताचे पालन केले, ज्याच्या प्रभावाने ते सर्व पापांतून मुक्त झाले. मंजुघोषेलाही या व्रताच्या पालनाने आपल्या पूर्वरूपाची प्राप्ती झाली, ज्यामुळे ती स्वर्गलोकात निघून गेली.”

ही कथा सांगितल्यानंतर लोमश ऋषींनी मांधाता राजाला सांगितले, “हे प्रिय राजन्! केवळ या व्रतपालनाने सर्व पापे नष्ट होतात. या एकादशीचे माहात्म्य वाचल्याने अथवा ऐकल्याने हजार गायी दान केल्याचे पुण्य प्राप्त होते. या एकादशी व्रताचे पालन केल्याने भ्रूणहत्या, ब्रह्महत्या, मद्यपान, परस्त्रीसंग, गुरुपत्नीसंग अशा अनेक पापांचा नाश होतो.”

१०. कामदा एकादशी

वराह पुराणात भगवान श्रीकृष्ण व महाराज युधिष्ठिर यांच्या संवादात कामदा एकादशीचे माहात्म्य सांगितले आहे.

महाराज युधिष्ठिर श्रीकृष्णांना म्हणू लागले, “हे यदुवर, कृपया माझा प्रणाम स्वीकार करा. चैत्र मासाच्या शुक्ल पक्षातील एकादशीचे वर्णन करा. या व्रताची विधी आणि तिचे पालन केल्याने होणाऱ्या लाभाचे वर्णन करा.”

भगवान श्रीकृष्ण म्हणाले, “प्रिय युधिष्ठिर महाराज! पुराणांत वर्णिलेले एकादशीचे माहात्म्य ऐका. एकदा प्रभू रामचंद्रांचे पितामह महाराज दिलीप यांनी आपले गुरू वसिष्ठ यांना हाच प्रश्न विचारला होता.”

वसिष्ठ म्हणाले, “हे राजन्! निश्चितच मी आपली इच्छा पूर्ण करीन. या एकादशीला कामदा म्हणतात. या व्रताच्या पालनाने सर्व पापे जळून भस्म होतात आणि व्रताचे पालन करणाऱ्याला पुत्रप्राप्ती होते.”

पुष्कळ वर्षांपूर्वी रत्नपूर (भोगीपूर) राज्यात पुंडरीक राजा आपली प्रजा गंधर्व, किन्नरांसह राहत होता. त्याच राज्यात अप्सरा ललिता आपला गंधर्व पती ललितासह राहत होती. त्यांचे एकमेकांवर फार प्रेम होते. प्रेम इतके प्रगाढ होते की एक क्षणही ते एकमेकांशिवाय राहत नसत.

एकदा पुंडरीक राजाच्या सभेत सर्व गंधर्व नृत्य व गायन करत होते. त्यात ललित गंधर्वही होता. पत्नी सभेत नसल्यामुळे त्याचे नृत्य व गायन तालात नव्हते. तिथे प्रेक्षकांमध्ये कर्कोटक नावाचा सर्पही होता. त्याने ललिताच्या विसंगत नृत्य व गायनाचे रहस्य जाणले आणि राजाला तसे सांगितले. राजा फार क्रोधित झाला; त्याने ललिताला शाप दिला, “हे पापात्म्या! आपल्या पत्नीविषयीच्या कामासक्तीमुळे तू नृत्यसभेत विसंगती निर्माण केली आहेस. म्हणून मी तुला नरभक्षक होण्याचा शाप देतो!”

पुंडरीकाकडून शाप मिळताच ललिताला भयंकर नरभक्षक राक्षसाचे रूप प्राप्त झाले. आपल्या पतीचे भयानक रूप पाहून ललितेला फार दुःख झाले. तरीही सर्व मर्यादा सोडून ती आपल्या पतीसह वनात राहू लागली.

वनात भ्रमण करत असताना विंध्य पर्वताच्या शिखरावर पवित्र शृंगी ऋषींचा आश्रम ललितेने पाहिला आणि तत्काळ आश्रमात जाऊन ऋषींसमोर तिने प्रणाम केला.

तिला पाहून शृंगी ऋषींनी विचारले, “तू कोण आहेस? तुझे पिता कोण आहेत? तू इथे कोणत्या कारणाने आली आहेस?” ललिता म्हणाली, “हे ऋषिवर! मी ललिता, वृंदावन गंधर्वाची कन्या आहे. आपल्या शापित पतीसह मी इथे आले आहे. गंधर्वराजा पुंडरीकाच्या शापाने माझे पती राक्षस बनले आहेत. त्यांचे हे रूप पाहून मला फार दुःख होत आहे. कृपया या शापातून मुक्ती मिळण्याचा उपाय सांगा, ज्या प्रायश्चित्ताने माझ्या पतीची राक्षसी योनीतून मुक्तता होईल.” ललितेची नम्र विनंती ऐकून शृंगी ऋषी म्हणाले, “हे गंधर्वकन्ये! काही दिवसांतच चैत्र मासाच्या शुक्ल पक्षातील कामदा एकादशी येईल. या व्रताचे तू कठोर पालन कर आणि तुला मिळणारे सर्व पुण्य आपल्या पतीला अर्पण कर. त्यामुळे ते या शापातून मुक्त होतील. ही एकादशी सर्व इच्छा पूर्ण करणारी आहे.”

“हे राजन्! ऋषींच्या सांगण्यानुसार ललितेने आनंदाने व कठोरपणे या व्रताचे पालन केले. द्वादशीच्या दिवशी भगवान वासुदेव व ब्राह्मणांसमोर तिने म्हटले, “मी माझ्या पतीची शापातून मुक्तता व्हावी म्हणून याचे पालन केले आहे. या व्रताच्या प्रभावाने माझे पती शापमुक्त होवोत.” आणि काय आश्चर्य, नरभक्षक ललित पुन्हा गंधर्व बनला. त्यानंतर ललिता व ललित सुखाने राहू लागले.

भगवान श्रीकृष्ण म्हणाले, “हे युधिष्ठिर महाराज! हे राजेश्वर! जो कोणीही या अद्भुत कथेचे श्रवण करील आणि आपल्या क्षमतेनुसार हिचे पालन करील तो ब्रह्महत्येच्या पातकातून व आसुरी शापातून मुक्त होईल.”

११. वरुथिनी एकादशी

वैशाख मासाच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या वरुथिनी एकादशीचे माहात्म्य भविष्योत्तर पुराणात श्रीकृष्ण व महाराज युधिष्ठिर यांच्या संवादात सांगितले आहे.

एकदा युधिष्ठिर महाराजांनी भगवान श्रीकृष्णांना विचारले, “हे वासुदेवा! वैशाख मासाच्या कृष्ण पक्षातील एकादशीचे नाव काय आहे? आणि या एकादशी व्रताचे पालन केल्याने काय फळ प्राप्त होते व तिचे माहात्म्य काय आहे?”

भगवान श्रीकृष्ण म्हणाले, “हे प्रिय राजन्! या एकादशीचे नाव वरुथिनी आहे, जी केल्याने या जन्मात व पुढील जन्मातही सौभाग्य प्राप्त होते. या एकादशी व्रताच्या प्रभावाने व्यक्ती सर्व पापांतून मुक्त होते, सोबतच तिला वास्तविक आनंदाची प्राप्ती होऊन ती भाग्यवान बनते. आणि जन्ममरणाच्या चक्रातून सुटका होऊन तिला भगवंतांची भक्ती प्राप्त होते. या व्रताच्या पालनाने मांधाता राजाला मुक्ती मिळाली. त्याचप्रमाणे महाराज धुंधुमारांसारखे अनेक राजेमहाराजेही मुक्त झाले. केवळ वरुथिनी एकादशीच्या व्रताने दहा हजार वर्षांच्या तपस्येचे फळ प्राप्त होते. तसेच सूर्यग्रहणाच्या वेळी कुरुक्षेत्रावर ४० किलो सुवर्णदान केल्याचे फळ हे व्रत केल्याने मिळते.”

“हे राजन्! गजदान हे अश्वदानाहून श्रेष्ठ आहे, भूमिदान हे गजदानाहून श्रेष्ठ मानले जाते आणि तिलदान हे भूमिदानाहूनही श्रेष्ठ आहे. सुवर्णदान हे तिलदानाहून श्रेष्ठ आहे तसेच अन्नदान हे सुवर्णदानाहूनही श्रेष्ठ आहे. हे राजन्! अन्नदान केल्याने पूर्वज, देवता आणि सर्व प्राणी प्रसन्न होतात. बुद्धिमान लोकांचा असा विचार आहे की कन्यादानही अन्नदानाइतकेच पुण्यकार्य आहे. स्वतः भगवंत सांगतात की अन्नदान हे गोदानाइतकेच श्रेष्ठ आहे. परंतु सर्वश्रेष्ठ विद्यादानच आहे.”

केवळ वरुथिनी एकादशी व्रताच्या पालनाने सर्व प्रकारची दाने दिल्यासारखे पुण्य प्राप्त होते. आपल्या उदरनिर्वाहासाठी जो आपली कन्या विकतो तो सर्वात नीच मनुष्य मानला जातो आणि प्रलयापर्यंत त्या व्यक्तीला नरकात दुःख भोगावे लागते. म्हणून कोणीही आपल्या कन्येच्या बदल्यात कधीही धन स्वीकारू नये. आणि जो व्यक्ती असे करतो त्याला पुढील जन्म मांजरीचा मिळतो. परंतु आपल्या क्षमतेनुसार जो व्यक्ती सुवर्णालंकारांनी सुशोभित करून योग्य वराला आपली कन्या प्रदान करतो त्या व्यक्तीच्या पुण्यांचा लेखाजोखा यमराजाचे सचिव चित्रगुप्तही करू शकत नाहीत.

या एकादशीच्या व्रताचे पालन करणाऱ्यांना काही गोष्टी वर्ज्य आहेत, त्या अशा :— कांस्याच्या भांड्यात खाऊ नये. मांसाहार करू नये. मसुराची डाळ, हिरव्या भाज्या, वाटाणे खाऊ नयेत. अभक्ताच्या हातचे बनवलेले खाऊ नये. दशमी व एकादशीच्या दिवशी मैथुन वर्ज्य आहे. जुगार खेळू नये. पान खाऊ नये. दात घासू नयेत (दंतमंजन करणे वर्ज्य आहे). व्यर्थ बडबड करू नये. खोटे बोलू नये. कोणाचीही निंदा करू नये. पापी व्यक्तीशी बोलू नये. दिवसा झोपू नये. कोणावरही क्रोध करू नये. मध खाऊ नये. दशमी, एकादशी व द्वादशीच्या दिवशी नखे व केस कापू नयेत. दाढीही करू नये. दशमी, एकादशी व द्वादशीच्या दिवशी शरीराला तेल लावू नये. सावधानतेने या सर्व गोष्टींचे पालन केल्याने उत्तम प्रकारे एकादशी व्रताचे पालन होते आणि पालन करणाऱ्याला जीवनाच्या सर्वोच्च ध्येयाची प्राप्ती होते. एकादशीच्या दिवशी जागरण केल्याने सर्व पापांचा क्षय होतो आणि त्याला भगवद्धामाची प्राप्ती होते. या एकादशीचा महिमा जो कोणीही ऐकतो अथवा वाचतो त्याला एक सहस्र गोदानाचे पुण्य मिळते आणि तो भगवान विष्णूंच्या धामाची प्राप्ती करतो.”

१२. मोहिनी एकादशी

सूर्य पुराणात वैशाख मासाच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या मोहिनी एकादशीच्या महिम्याचे वर्णन आहे.

महाराज युधिष्ठिरांनी भगवान श्रीकृष्णांना विचारले, “हे जनार्दना! वैशाख मासाच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीचे नाव काय आहे? या व्रताचे पालन कसे करावे? हे केल्याने काय पुण्य प्राप्त होते, कृपया आपण विस्ताराने सांगा.”

भगवान श्रीकृष्ण म्हणाले, “हे धर्मपुत्रा! लक्षपूर्वक ऐका! जी कथा वसिष्ठ मुनींनी प्रभू रामचंद्रांना सांगितली होती ती मी आपल्याला सांगतो.”

पूर्वकाळी प्रभू रामचंद्र वसिष्ठ महाराजांना विचारू लागले, “हे आदरणीय ऋषिवर! सीतेच्या विरहाने मी अत्यंत निराश आहे. कृपया आपण मला असे व्रत सांगा ज्याच्या प्रभावाने सर्व पापांतून व दुःखांतून मुक्ती मिळेल.”

प्रभू रामचंद्रांचे आध्यात्मिक गुरू वसिष्ठ म्हणाले, “प्रिय रामा! आपण फार बुद्धिमान आहात! आपल्या पवित्र नामानेच सर्व प्राण्यांची दुःखे दूर होतात, त्यांचे जीवन मंगलमय होते. तरीही सर्व जीवांच्या उद्धारासाठी विचारलेला हा प्रश्न प्रशंसनीय आहे. आता मी आपल्याला या व्रताची विस्तारपूर्वक कथा सांगतो. वैशाख मासाच्या शुक्ल पक्षात मोहिनी एकादशी येते. ती फारच मंगलकारक आहे; या व्रताच्या पालनाने व्यक्ती संसाराच्या दुःखांतून, अनेक पापांतून तसेच भौतिक भ्रमातून मुक्त होते.”

“प्राचीन काळी सरस्वती नदीच्या काठी रम्य भद्रावती नामक राज्य होते. धृतिमान नामक राजा तिथे राज्य करत होता. चंद्रवंशात जन्मलेला हा राजा सहिष्णू व सत्यवादी होता. त्याच शहरात धनपाल नावाचा एक वैश्य होता जो फार पुण्यवान वैष्णव होता. जनहितासाठी त्या भक्त धनपालाने नगरात अनेक धर्मशाळा, रुग्णालये, मोठे मार्ग, पाठशाळा, बाजार आणि भगवान विष्णूच्या मंदिराची स्थापना केली होती. पिण्याच्या पाण्याच्या विहिरी, शुद्ध जलाचे तलाव तसेच अन्नछत्रे संपूर्ण नगरात बांधली होती. अशा प्रकारे जनकल्याणासाठी आपल्या धनाचा योग्य प्रकारे उपयोग करत त्याने आपले नाव धनपाल खरोखर सार्थ केले. सर्वांचे हित चिंतणाऱ्या, सर्वांवर प्रेम करणाऱ्या या वैष्णवाला पाच पुत्र होते. समन, द्युतिमान, मेधावी, सुकीर्ती आणि धृष्टबुद्धी ही त्यांची नावे होती. या सर्वांमध्ये धृष्टबुद्धी फार पापी व दुराचारी होता. दुष्ट व्यक्तींचा संग, व्यभिचारी स्त्रियांचा संग, निष्पाप पशूंची हत्या, मांस व मदिरापान करणे या सर्व पापकृत्यांमुळे तो अत्यंत पापी व दुराचारी बनला होता. आपल्या परिवारासाठी तो कलंक होता. देवता, ब्राह्मण, वडीलधारे तसेच अतिथींना तो कधीही आदर देत नसे, सदैव पाप करण्यात रत असे.

एके दिवशी रस्त्यावर वेश्येच्या खांद्यावर हात ठेवून जाताना त्याला त्याचे पिता धनपाल यांनी पाहिले आणि त्यांना फार दुःख झाले. त्याच दिवशी त्यांनी धृष्टबुद्धीला घराबाहेर काढले. म्हणून धृष्टबुद्धी आपले मातापिता, भाऊ, नातेवाईक व वैश्य समाजापासून दुरावला आणि प्रत्येकाच्या तिरस्काराचा विषय बनला. पित्याने काढून टाकल्यामुळे धृष्टबुद्धी घराबाहेर जाऊन अधिक पापकृत्यांत गुंतला. स्वतःची वस्त्रे व धन विकून जे काही मिळाले ते सर्व त्याने पापकृत्यांत लावले. अखेरीस जेव्हा धन संपले तेव्हा निर्धनतेमुळे त्याची अवस्था भिकाऱ्यासारखी झाली. अन्न न मिळाल्याने त्याचे शरीर दुर्बळ झाले, त्याच्या सर्व धूर्त मित्रांनी सबबी सांगून त्याचा त्याग केला.

धृष्टबुद्धीला अतिशय चिंता होत होती, भुकेने तो व्याकूळ होत होता. आता मी काय करावे? अन्न व धन कोठून प्राप्त होईल? या प्रश्नांचा विचार करून तो अशांत होत होता. अखेर त्याने चोरी करण्याचा निश्चय केला आणि सुरुवातही केली. अनेकदा राजाच्या शिपायांनी त्याला पकडल्यानंतरही, त्याच्या पित्याचा मान व मोठेपणा पाहून ते त्याला सोडून देत. तरीही त्याने चोरी करणे बंद केले नाही. एकदा विशेष चोरी करताना तो पकडला गेला. तेव्हा राजाने त्याला सांगितले, “हे मूर्खा, आज तू या राज्यात राहू शकत नाहीस कारण तू महापापी आहेस. मी तुला आत्ता सोडत आहे, तत्काळ या राज्याबाहेर निघून जा. तुला जिथे जायचे असेल तिथे तू जाऊ शकतोस.”

पुन्हा शिक्षा मिळण्याच्या भयाने धृष्टबुद्धी राज्याबाहेर घनदाट वनात गेला. अविवेकामुळे निष्पाप प्राण्यांची हत्या करून त्यांचे कच्चे मांस तो खाऊ लागला. एखाद्या शिकाऱ्याप्रमाणे हातात धनुष्य घेऊन तो वनात पापकृत्ये करत भटकू लागला.

धृष्टबुद्धी सतत दुःखी व चिंतित राहत असे. परंतु एके दिवशी त्याच्या मागील जन्मीच्या पुण्यकर्माच्या प्रभावाने तो एका ऋषींच्या आश्रमात पोहोचला. त्या आश्रमात कौंडिन्य नामक मोठे तपस्वी राहत होते. वैशाख मास होता आणि कौंडिन्य मुनी गंगास्नानाहून परतत होते. दुःखांनी त्रस्त धृष्टबुद्धीने नकळत ऋषींच्या वस्त्रांतून ठिबकणाऱ्या जलाला स्पर्श केला आणि आश्चर्य! तो आपल्या सर्व पापांतून मुक्त झाला. त्याच वेळी त्याने ऋषींना दंडवत प्रणाम करून विनम्रतेने विचारले, “हे ऋषिवर! मी फार पापी व्यक्ती आहे. असे कोणतेही पाप नाही जे मी केले नाही. कृपया असे व्रत सांगा ज्याच्या प्रभावाने मी सर्व पापांतून मुक्त होईन. अमर्याद पापकृत्यांमुळे मी माझ्या कुटुंबापासून, मित्रांपासून, समाजापासून दुरावलो आहे, सोबतच मी मानसिक दुःखाच्या खाईत पडलो आहे.”

हे सर्व ऐकताच परदुःखे दुःखी होणारे कौंडिन्य ऋषी म्हणाले, “ऐक! मेरू पर्वताहूनही प्रचंड अशा पापांच्या राशी नष्ट करणाऱ्या व्रताविषयी मी तुला सांगतो. त्या व्रताच्या पालनाने काही क्षणांतच तुझ्या पापांचा नाश होईल. वैशाख मासाच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीचे पालन करताच तू सर्व पापांतून मुक्त होशील.”

ऋषींच्या आदेशाने धृष्टबुद्धीने या व्रताचे कठोर पालन केले. हे राजन्! या व्रताच्या पालनाने तो सर्व पापांतून मुक्त होऊन दिव्य शरीर प्राप्त करून गरुडावर स्वार होऊन विष्णुलोकाला गेला. हे रामचंद्र! या व्रताने व्यक्ती सर्व पापांतून व भ्रमातून मुक्त होते. या व्रताने प्राप्त होणारे फळ तीर्थात स्नान केल्याने अथवा यज्ञ केल्याने प्राप्त होणाऱ्या फळाहूनही श्रेष्ठ आहे.

अपरा (अचला) एकादशी

कृष्ण पक्षातील ज्येष्ठ मासाच्या एकादशीला अपरा अथवा अचला एकादशी म्हटले जाते. या दिवशी भगवान त्रिविक्रमाची पूजा केली जाते. ही केल्याने कीर्ती, पुण्य तसेच धनाची वृद्धी होते आणि भूतप्रेतांसारख्या निकृष्ट योनींतून मुक्ती मिळते. या दिवशी चंदन, कापूर, गंगाजलासह भगवान विष्णूंची पूजा करावी.

पुलकित मनाने भगवान श्रीकृष्णांना नमस्कार केल्यानंतर धर्मराज युधिष्ठिरांनी भगवान कृष्णांना प्रार्थना केली — हे महाराज! आता माझी इच्छा ज्येष्ठ मासाच्या कृष्ण पक्षातील एकादशीचे नाव, माहात्म्य, पूजाविधान आदींविषयी विस्तारपूर्वक जाणून घेण्याची आहे. तर आपण कृपा करून सांगा.

श्रीकृष्ण भगवान म्हणू लागले — हे राजन्! या एकादशीचे नाव अपरा आहे. ही अपार धन देणारी आहे. जे मनुष्य हे व्रत करतात, त्यांना संसारात यश व कीर्तीची प्राप्ती होते. अपरा एकादशीच्या व्रताच्या प्रभावाने ब्रह्महत्या, भूतयोनी तसेच परनिंदा आदी सर्व पापे दूर होतात. या व्रताने परस्त्रीगमन, खोटी साक्ष देणे, असत्य भाषण, कल्पित शास्त्र वाचणे किंवा रचणे, खोटा ज्योतिषी, खोटा वैद्य बनणे आदी पापेही नष्ट होतात. जे क्षत्रिय असूनही युद्धातून पळून जातात, ते नरकगामी होतात; परंतु अपरा एकादशीचे व्रत केल्याने त्यांनाही स्वर्गाची प्राप्ती होते. जे शिष्य गुरूंकडून शिक्षण घेतात आणि नंतर त्यांची निंदा करतात, ते निश्चितच नरकात पडतात; परंतु अपरा एकादशीचे व्रत केल्याने तेही या पापातून मुक्त होतात.

जे फळ तिन्ही पुष्करांत कार्तिक पौर्णिमेला स्नान केल्याने किंवा गंगातीरी पितरांना पिंडदान केल्याने प्राप्त होते, तेच अपरा एकादशीचे व्रत केल्याने प्राप्त होते. मकरेच्या सूर्यात प्रयागराजच्या स्नानाने, शिवरात्री व्रताने, सिंह राशीतील बृहस्पतीत गोमती नदीच्या स्नानाने, कुंभात केदारनाथ किंवा बद्रिकाश्रमाच्या यात्रेने, सूर्यग्रहणात कुरुक्षेत्राच्या स्नानाने, सुवर्ण अथवा हत्तीघोडे दान केल्याने अथवा नवप्रसूत गायीच्या दानाने जे फळ मिळते, तेच फळ अपरा एकादशीच्या व्रताने मिळते. हे व्रत पापरूपी वृक्ष तोडण्यासाठी कुऱ्हाड आहे. पापरूपी इंधन जाळण्यासाठी अग्नी, पापरूपी अंधारासाठी सूर्यासमान आहे. अपरा एकादशीचे व्रत तसेच भगवंतांचे पूजन केल्याने मनुष्य सर्व पापांतून सुटून विष्णुलोकाला जातो.

हे राजन्! ही अपरा एकादशीची कथा मी लोकहितासाठी सांगितली आहे; ही वाचल्याने अथवा ऐकल्याने मनुष्य सर्व पापांतून मुक्त होतो यात संदेह नाही.

निर्जला एकादशी

वर्षातील चोवीस एकादशींपैकी ज्येष्ठाच्या शुक्ल पक्षातील एकादशी सर्वाधिक फळ देणारी आहे. या एकादशीचे व्रत ठेवल्यानेच वर्षभरातील एकादशींच्या व्रतांचे फळ प्राप्त होते. या एकादशीत एकादशीच्या सूर्योदयापासून द्वादशीच्या सूर्यास्तापर्यंत जलही ग्रहण न करण्याचे विधान असल्यामुळे हिला निर्जला एकादशी म्हटले जाते. ज्येष्ठ मासात दिवस फार मोठे असतात आणि तहानही फार लागते. अशा स्थितीत इतके कठीण व्रत ठेवणे हे खरोखर मोठ्या साधनेचे काम आहे.

व्रताचे विधिविधान

या व्रताच्या दिवशी निर्जल व्रत करत शेषशायी रूपात भगवान विष्णूंच्या आराधनेला विशेष महत्त्व मानले गेले आहे. जलपान निषिद्ध असूनही या व्रतात फलाहारानंतर दूध पिण्याचे विधान आहे. या एकादशीचे व्रत केल्यानंतर द्वादशीला ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून ब्राह्मणांना भोजन घालून दान द्यावे. या एकादशीच्या दिवशी आपल्या शक्ती व सामर्थ्यानुसार ब्राह्मणांना धान्य, वस्त्र, छत्री, फळे, जलाने भरलेले कलश व दक्षिणा देण्याचे विधान आहे. सर्व व्यक्ती प्रायः मातीचे घडे अथवा सुरया, पंखे व धान्याचे दान तर करतातच, या दिवशी गोड सरबताची पाणपोईही उभारतात.

निर्जला एकादशी माहात्म्य

श्रीसूत म्हणाले — हे ऋषींनो! आता सर्व व्रतांत श्रेष्ठ, सर्व एकादशींत उत्तम अशा निर्जला एकादशीची कथा ऐका.

एकदा पांडवपुत्र भीमसेनाने वेदव्यासांना विचारले — हे महाज्ञानी पितामह! माझे चारही भाऊ युधिष्ठिर, अर्जुन, नकुल, सहदेव आणि माता कुंती तसेच भार्या द्रौपदी एकादशीच्या दिवशी कधीही भोजन करत नाहीत; ते मलाही सदैव तसे करण्यास सांगत असतात. मी त्यांना सांगतो की मला तर भूक सहन होत नाही; मी दान व विधिवत भगवंतांची पूजाआराधना करीन. तर कृपा करून असा उपाय सांगा की उपवास न करताही मला एकादशी व्रताचे फळ प्राप्त होईल. तेव्हा व्यास म्हणाले, जर स्वर्ग चांगला व नरक वाईट वाटत असेल तर हे भीमसेना! दोन्ही पक्षांच्या एकादशीला भोजन करू नकोस. तेव्हा भीमाने विनंती केली, हे महामुनी! मी जे काही सांगतो तेही ऐका; जर दिवसातून एकदाही भोजन मिळाले नाही तर मला राहवत नाही, मी उपवास कसा करू? माझ्या उदरात वृक नामक अग्नीचा निवास आहे; पुष्कळ भोजन केल्यानेच माझी भूक शांत होते. हे मुनी! मी वर्षभरात केवळ एकच व्रत करू शकतो, तर आपण कृपा करून केवळ एक व्रत सांगा जे विधिपूर्वक करून मी स्वर्ग प्राप्त करू शकेन. ते निश्चित करून सांगा ज्याने माझे कल्याण होईल. व्यास म्हणाले, हे भीमसेना! मनुष्यांसाठी सर्वोत्तम वेदाचा धर्म आहे, परंतु कलियुगात त्या धर्मावर चालण्याची शक्ती कोणातही नाही. म्हणून थोड्या धनाने व थोड्या कष्टाने होणारा सोपा उपाय जो पुराणांत लिहिला आहे तो मी तुला सांगतो. दोन्ही पक्षांच्या एकादशींना जे मनुष्य भोजन करत नाहीत ते नरकात जात नाहीत.

हे वचन ऐकून महाबली भीमसेन प्रथम तर पिंपळपानाप्रमाणे थरथरू लागले, मग भीत भीत म्हणाले, हे पितामह! मी उपवास करण्यास असमर्थ आहे, म्हणून हे प्रभो, निश्चितच पुष्कळ फळ देणारे एक व्रत मला सांगा. तेव्हा व्यास म्हणाले — वृषभ-मिथुन राशीतील सूर्यात ज्येष्ठ मासात शुक्ल पक्षात जी एकादशी येते, तिचे निर्जल व्रत प्रयत्नपूर्वक करणे उचित आहे. स्नान व आचमनाखेरीज जलपान वर्ज्य; केवळ एका घोटभर पाण्याने आचमन करावे, अधिक प्यायल्याने व्रत खंडित होते. एकादशीच्या सूर्योदयापासून द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत जल ग्रहण करू नये आणि भोजनही करू नये; तर विनासायास सर्व द्वादशीयुक्त एकादशींचे फळ मिळते. द्वादशीला प्रातःकाळी स्नान करून सुवर्ण व जल ब्राह्मणांना दान करावे, मग ब्राह्मणांसह भोजन करावे. हे भीमसेना! या विधीने व्रत केल्याने जे फळ मिळते ते ऐक — वर्षभरात ज्या एकादशी येतात त्या सर्वांचे फळ निःसंशय केवळ या एकादशीच्या व्रताने प्राप्त होते. शंख, चक्र, गदाधारी भगवान विष्णूंनी स्वतः मला सांगितले आहे की सर्व त्यागून केवळ माझ्या शरणी या. आणि ऐक, एकादशीचे निराहार व्रत केल्याने मनुष्य सर्व पापांतून सुटतो; सर्व तीर्थांची यात्रा तसेच सर्व प्रकारच्या दानांत जे फळ मिळते ते सर्व या एकादशीच्या व्रताने मिळते. कलियुगात दान दिल्यानेही अशी सद्गती होत नाही; अधिक काय सांगू, ज्येष्ठ शुक्ल पक्षातील एकादशीला जल व भोजन करू नये. हे वृकोदरा! या व्रताने जे फळ मिळते ते ऐक! सर्व एकादशी व्रतांनी जी धनधान्य व आयुष्य-आरोग्यादींची वृद्धी होते ती सर्व फळे निःसंशय या एकादशीच्या व्रताने प्राप्त होतात. हे नरसिंह भीमा! मी तुला सत्य सांगतो की हे केल्याने अति भयंकर काळ्यापिवळ्या रंगाचे यमदूत, भय देणारा दंड व फास घेऊन त्या मनुष्याजवळ येत नाहीत; उलट पीतांबरधारी, हातांत चक्र घेतलेले मोहिनीमूर्ती विष्णूंचे दूत अंतसमयी विष्णुलोकात नेण्यासाठी येतात. म्हणून जलरहित व्रत करणे उचित आहे; मग जल व गोदान केल्याने मनुष्य सर्व पापांतून मुक्त होतो.

वैशंपायन सांगतात — हे जनमेजया! तेव्हापासून भीमसेन हे व्रत करू लागले आणि तेव्हापासूनच याचे नाव भीमसेनी झाले. हे राजन्! याचप्रमाणे तू सर्व पापे दूर करण्यासाठी उपवास करून विष्णूंची पूजा कर आणि अशी प्रार्थना कर की हे भगवंता! मी आज निर्जल व्रत करीन. हे देवेश अनंता! द्वादशीला भोजन करीन. असे म्हणून सर्व पापांच्या निवृत्तीसाठी श्रद्धेने इंद्रियांना वश करून व्रत करावे. स्त्री व पुरुषांची मंदराचल पर्वतासमान (मोठ्यात मोठी) पापेही या एकादशीच्या प्रभावाने नष्ट होतात. जर गाय दान करता येत नसेल तर वस्त्रात बांधलेल्या सुवर्णासह घडा दान करावा. निर्जला एकादशीला स्नान, दान, तप, होमादी जी धर्मकार्ये मनुष्य करतो ती सर्व अक्षय होतात. हे राजन्! ज्याने एकादशीचे विधिवत व्रत केले त्याला आणखी धर्माचरण करण्याची काय आवश्यकता? सर्व प्रकारची व्रते केल्याने विष्णुलोक प्राप्त होतो; आणि हे कुरुश्रेष्ठ! एकादशीच्या दिवशी जे मनुष्य अन्नभोजन करतात ते पापी आहेत. ते या लोकात चांडाळ होतात आणि अखेरीस दुर्गती पावतात. या एकादशीचे व्रत करून दान देणारे मोक्ष प्राप्त करतील. ब्रह्महत्या, मदिरापान, चोरी, गुरूंशी द्वेष आणि मिथ्या (खोटे) बोलणे ही सर्व महापापे द्वादशीयुक्त एकादशीचे व्रत केल्याने क्षय पावतात. हे कुंतीपुत्र भीमा! आता या व्रताची विधी ऐक. हे व्रत स्त्री व पुरुषांनी अत्यंत श्रद्धेने इंद्रियांना वश करून करावे. क्षीरशायी भगवंतांची पूजा करून गोदान करावे. दूध देणारी गाय, मिष्टान्न व दक्षिणेसह विधिपूर्वक दान करावे. हे श्रेष्ठ भीमा! अशा प्रकारे ब्राह्मण चांगल्या रीतीने प्रसन्न झाल्याने श्रीविष्णू भगवान संतुष्ट होतात. ज्याने हे महाव्रत केले नाही त्याने आत्मद्रोह केला. तो दुराचारी आहे; आणि ज्याने हे व्रत केले त्याने आपल्या शंभर पूर्वीच्या नातलगांना स्वतःसह स्वर्गात पोहोचवले आणि मोक्ष प्राप्त केला. जे मनुष्य शांतपणे दान व पूजा करून रात्री जागरण करतात आणि द्वादशीच्या दिवशी अन्न, जल, वस्त्र, उत्तम शय्या व कुंडले सुपात्र ब्राह्मणाला दान करतात ते निःसंशय सुवर्णाच्या विमानात बसून स्वर्ग प्राप्त करतात. जे फळ नाशिनी अमावास्येला अथवा सूर्यग्रहणात दानपुण्य करून मिळते तेच फळ हे ऐकल्याने मिळते. दंतधावन करून विधीनुसार अन्न व जलाविना व्रत करणाऱ्या मनुष्याने या एकादशीचे व्रत करावे आणि आचमनाचे जलही न पिता द्वादशीच्या दिवशी देवदेवेश त्रिविक्रम भगवंतांची पूजा करावी. जल, पुष्प, धूप, दीप अर्पण करून यथाविधी पूजन करून प्रार्थना करावी की हे देवेश! हे हृषीकेश, हे संसारसागरातून पार करणारे! या घड्याच्या दानाने मला मोक्ष प्राप्त होवो. हे भीमसेना! मग आपल्या सामर्थ्यानुसार अन्न, वस्त्र, छत्र, फळे आदी घड्यावर ठेवून ब्राह्मणांना दान द्यावे; त्यानंतर श्रद्धापूर्वक ब्राह्मणांना भोजन घालून स्वतःही मौन राहून भोजन करावे. अशा प्रकारे जे हे व्रत यथाविधी करतात ते सर्व पापांतून सुटून मुक्त होतात.

प्रस्तावना

पुष्कळ भक्तांच्या आग्रहावरून हे पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. श्रील व्यासदेवांनी पुराणांत एकादशीव्रताचे माहात्म्य अनेक ठिकाणी सांगितले आहे. या पुस्तकात प्रत्येक एकादशीच्या माहात्म्याचे वर्णन कथारूपाने केले आहे. कथा वाचल्यानंतर कोणाला असे वाटेल की या पालनाने भौतिक लाभ होतो, म्हणून हे व्रत केवळ भौतिक लाभासाठीच असावे. परंतु तसे नाही; जो वैष्णव आहे, त्याच्यासाठी हे सर्वश्रेष्ठ व्रत आहे. एकादशी भगवान श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय आहे, म्हणून तिला हरिवासर म्हणतात.

‘उपवास’ या शब्दाचा अर्थ आहे जवळ राहणे. आपल्याला जर भगवंतांच्या निकट राहायचे असेल, तर उपवास करणे आवश्यक आहे. म्हणूनच एकादशीच्या दिवशी सर्व भौतिक इंद्रियतृप्तीच्या कार्यांपासून दूर राहून भगवंतांच्या नामस्मरणात अधिकाधिक वेळ घालवावा. ब्रह्मवैवर्त पुराणात म्हटले आहे की —

उपावृत्तस्य पापेभ्यो यस्तु वासो गुणैः सह। उपवासः स विज्ञेयः सर्वभोगविवर्जितः॥

उपवास म्हणजे सर्व पापांपासून आणि इंद्रियतृप्तीच्या कार्यांपासून दूर राहणे. निश्चितच एकादशी व्रताच्या पालनाने धर्म, अर्थ, काम, मोक्ष यांची प्राप्ती तर होतेच, पण त्यासोबत पंचम पुरुषार्थ भगवद्भक्ती अथवा कृष्णप्रेमही प्राप्त होते.

श्री हरिभक्तिविलास नामक ग्रंथात सांगितले आहे की —

एकादशीव्रतं नाम सर्वकामफलप्रदम्। कर्तव्यं सर्वदा विप्रैः विष्णुप्रीणनकारणम्॥

भगवान श्रीविष्णूंच्या प्रसन्नतेसाठी ब्राह्मणांनी एकादशी व्रताचे पालन करावे. हे त्यांचे कर्तव्य आहे. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी या व्रताचे पालन करावे. भगवान श्रीविष्णू प्रसन्न झाल्याने सुख व समृद्धी आपोआप प्राप्त होते.

ॐ विष्णुपाद नित्यलीला प्रविष्ट सच्चिदानंद भक्तिविनोद ठाकुर आपल्या एका गीतात लिहितात —

माधव तिथि भक्ति जननी, जानते पालन करी।

माधव तिथी अर्थात एकादशी, जन्माष्टमी इत्यादी व्रते; भक्तिजननी म्हणजे आपल्या हृदयात भक्ती निर्माण करणारी. म्हणून ते सांगतात की आपण प्रयत्नपूर्वक तिचे पालन करावे.

संतशिरोमणी श्री तुकाराम महाराज म्हणतात —

ज्यासी नावडे एकादशी। तो जिताची नरकवासी। ज्यासी नावडे हे व्रत। त्यासी नरक तोहि भीत। ज्यासी घडे एकादशी। जाणे लागे विष्णुपाशी। तुका म्हणे पुण्यराशी। तोचि करी एकादशी॥

ज्याला ही एकादशी आवडत नाही, तो जिवंतपणीच नरकात राहणारा व्यक्ती आहे. ज्याला हे व्रत आवडत नाही त्याला नरकही भितो, कारण तो व्यक्ती महापापी मानला जातो. जो एकादशी व्रताचे पालन करतो, त्याला निश्चितच वैकुंठाची प्राप्ती होते. म्हणूनच तुकाराम महाराज सांगतात की ज्याने पूर्वजन्मी पुण्याच्या राशी जमवल्या आहेत, तोच केवळ एकादशी व्रताचे पालन करतो.

एकादशीला अन्नग्रहण केल्याने काय होते याचे वर्णन तुकाराम महाराज असे करतात —

एकादशीस अन्नपान। जे नर करिती भोजन। श्वान विष्ठेसमान। अधम जन ते एक। तया देही यमदूत। जाले तयाचे अंकित। तुका म्हणे व्रत। एकादशी चुकलिया॥

जे लोक एकादशीला अन्नग्रहण करतात, भोजन करतात ते फार पतित जीव आहेत. त्यांना अधम मानले जाते, कारण ते जे भोजन करतात ते श्वानाच्या विष्ठेसमान असते. जो हे व्रत करत नाही, त्याच्यासाठी यमदूतच असतात; तो नरकगामी बनतो.

एकादशीच्या दिवशी पापपुरुष अन्नात वास करतो, म्हणून अन्नग्रहण करू नये. ज्याला आपले हित साधायचे असेल त्याने एकादशीच्या दिवशी पुढील अन्नाचा त्याग करावा —

  1. तांदूळ तसेच त्यापासून बनलेले पदार्थ,
  2. गहू, ज्वारी, मका यांपासून बनलेले पदार्थ,
  3. डाळी — मूग, मसूर, तूर, हरभरा, वाटाणा इत्यादी,
  4. जव,
  5. मोहरी व तिळाचे तेल.

चुकूनही या पदार्थांचे सेवन करू नये, अन्यथा व्रत भंग होते.

भक्तीत प्रगती करू इच्छिणाऱ्या व्यक्तीने यांचे पालन करावे. एकाच दिवशी दोन तिथी येत असतील तर वैष्णव त्या दिवसाचे व्रत अथवा उत्सव दुसऱ्या दिवशी करतात. म्हणून आपल्याला स्मार्त आणि भागवत अशा दोन एकादशी दिसतात. हरिभक्तिविलास या ग्रंथात सांगितले आहे — हे ब्राह्मणा, सूर्योदयापूर्वी ९६ मिनिटांच्या आधी एकादशी सुरू होते, त्या एकादशीला शुद्ध एकादशी म्हणावे. गृहस्थांनी या एकादशीचे पालन करावे.

एकादशी करणाऱ्या किंवा करण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने हा ग्रंथ लक्षपूर्वक वाचावा.

— संग्राहक

स्रोत 1

  • Vrat Katha (Archive.org - VratKathaBook) — एकादशी माहात्म्य एवं चौदह एकादशी व्रत कथाएँ, पृष्ठ 62–97 एवं 48–54

    एकादशी माहात्म्य व व्रतकथा पुस्तकाच्या स्कॅन केलेल्या पृष्ठचित्रांतून अक्षरशः उतरवल्या गेल्या आणि प्रमाण मराठी लेखनात संपादित केल्या गेल्या.

अर्थ वेद पथ संपादकीय संघाने संकलित व संपादित केले आहेत, आणि साहित्याचे टप्प्याटप्प्याने पुनरावलोकन सुरू आहे.

संबंधित रचना 4

आणखी पाहा 16